Friday, May 3, 2024
Homeनगरनगर राज्यात सर्वाधिक कूल

नगर राज्यात सर्वाधिक कूल

दिवसभर धुक्याची चादर : हुडहुडीने महाराष्ट्र गारठला

अहमदनगर (प्रतिनिधी) – शनिवारी नगर जिल्हा राज्यात सर्वात थंडगार ठरला. शनिवारी सकाळपासून दिवसभर जिल्ह्यात धुक्याची चादर होती. यामुळे सकाळी 11 पर्यंत दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना दिवे लावून प्रवास करण्याची वेळी आली. राज्यात शनिवारी नगरचे तापमान सर्वात कमी 10.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. नगरनंतर औरंगाबादमध्ये 10.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून गार बोचर्‍या वार्‍यामुळे आधीच नगरकरांना हुडहुडी भरलेली असताना शनिवारी विचित्र हवामान नगरकरांनी अनुभवले. शनिवारी दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही. दिवसभर थंडी कायम होती. ग्रामीण भागात दुपारी 12 वाजेपर्यंत दव स्वरूपात हलके कण पडत होते. यासह गार वार्‍यामुळे वातावरण अधिक थंड होते.

रब्बी हंगामातील पिकांना थंडी पोषक असली तरी ढगाळ वातावरणमुळे पिकांवर विविध रोग पडल्याचे आढळून येत आहे.
गारवा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम माणसांवर देखील होतांना दिसत असून सध्या सर्वत्र रुग्णालय फुल्ल असल्याचे दिसत आहेत. डॉक्टरांकडून देखील थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशी परिस्थिती राहिल्यास नगरकर चांगलेच गारठण्याची शक्यता आहे.

राज्यात हुडहुडी
शनिवारी दिवसभर राज्यात नोंदविल्या गेलेल्या तापमानात सर्वाधिक तापमान अलिबाग येथे 16 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. उर्वरित ठिकाणी यापेक्षा कमी तापमान असल्याने संपूर्ण राज्यात हुडहुडी असल्याचे समोर आले.

आरोग्याची काळजी घ्या
गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांमुळे सर्दी, डोकेदुखी, ताप असे आजार बळावले आहेत. विविध दवाखान्यांमध्ये रूग्णांची गर्दी वाढत आहे. त्यातच आजचे हवामान पाहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.

सकाळ धुक्यात हरवली
सकाळी झोपेतून उठल्यानंतर बाहेर सर्वत्र दाट धुके पडल्याचे पाहून नगरकर थक्क झाले. धुक्याचे कण घरामध्येही प्रवेश करत होते. अनेकांनी आपला फोटोग्राफीचा छंद यात जोपासून घेतला. सकाळी दहापर्यंत धुके सर्वत्र दिसत होते. ग्रामीण भागाला तर उशिरापर्यंत धुक्याने वेढले होते.

दिवसभर हुडहुडी
शनिवारी दिवसभर हुडहुडी भरलेली होती. भर दुपारीही उबदार कपडे घालून नगरकर घराबाहेर पडत होते. शासकीय आस्थापनामधील कर्मचार्‍यांची संख्याही रोडावलेली दिसून आली. एवढेच नव्हे, तर विविध तक्रारी घेऊन येणार्‍या नागरिकांच्या गर्दीने फुलणार्‍या महापालिकेत देखील सामसूम होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या