संगमनेर (शहर प्रतिनिधी)ः- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी जप्त करून पोलीस वसाहतीमध्ये ठेवलेल्या अनेक मोटरसायकलच्या टाक्यांमधून पेट्रोलची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शहरात लॉकडाऊन सुरू आहे. नागरिकांनी घरातच थांबावे यासाठी पोलिसांनी अनेक पावले उचलली आहेत. अनावश्यक वाहने वापरू नयेत अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला होता असे असतानाही अनेक जण शहरात आपल्या मोटारसायकल व इतर वाहनांमधून फिरत असल्याने पोलिसांनी अशा वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यांच्याकडील मोटारसायकल जप्त करून ही वाहने पोलीस वसाहतीमधील मोकळ्या जागेत ठेवण्यात आली आहेत. या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी याठिकाणी होमगार्ड व पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या वाहनांतून पेट्रोलची मोठी चोरी होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पेट्रोलच्या टाकीच्या खाली असणारी नळी कापून टाकीतील पेट्रोल काढले जात आहे. अनेक वाहनचालकांनी आपल्या वाहनात भरपूर पेट्रोल भरून ठेवले होते मात्र वाहने ताब्यात घेतल्यानंतर मात्र गाडीतील पेट्रोलची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे अनेकांना पेट्रोलपंपापर्यंत पायी जाण्याची वेळ आली जप्त केलेली वाहने पोलिसांच्या ताब्यात असताना यापूर्वी वाहनांचे सुटे भाग चोरी झाल्याचे समोर आले होते आता पेट्रोलची चोरी उघड होत आहे. ही चोरी नेमके कोण करते या चोरट्यांना कुणाचा आशीर्वाद तर नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे.




