Thursday, July 2, 2026
Homeनगरसंगमनेरचे चौघे, जामखेडचे दोघे करोनामुक्त

संगमनेरचे चौघे, जामखेडचे दोघे करोनामुक्त

नगरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना बाधित असलेल्या संगमनेर येथील चौघांचे तर जामखेड येथील दोन जणांचे 14 दिवसानंतरचे दोन अहवाल निगेटिव्ह निघाल्याने त्यांना बुधवारी नगरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या सहा रुग्णाची बूथ हॉस्पिटलमधून तपासणीनंतर तालुक्याच्या ठिकाणी असणार्‍या क्वारंटाईन केंद्रात रवानगी करण्यात आली. यावेळी बूथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस, इतर आरोग्य कर्मचार्यांनी स्वागत करुन त्यांना निरोप दिला. जिल्ह्यात आतापर्यंत करोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 34 झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या रुग्णावर उपचार करणार्‍या बूथ हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे आणि त्याचबरोबर करोना प्रतिबंधासाठी अहोरात्र राबणार्‍या आरोग्य यंत्रणेचे आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या यंत्रणांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केले. नागरिकांनी लॉकडाऊन काळात दाखविलेल्या संयमाचे आणि सहकार्याचे सर्व मंत्री आणि जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आभार मानत आगामी काळातही सर्वांनी काळजी घेण्याचे आणि करोनाला दूर ठेवण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यातील 44 करोना बाधित रुग्णांपैकी आता आठ रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या 18 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुनयापैकी 16 व्यक्तींचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटीव आले आहेत.

संगमनेर येथे 4 नेपाळी व्यक्ती 14 दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात आल्या होत्या. त्यांचे 14 दिवसानंतर स्त्राव नमुने घेतले असता ते पॉझिटीव आले होते. त्यामुळे त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे सात दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटीव आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, जामखेड येथील कोरोना बाधित मृत व्यक्तीच्या मुलांच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवालही निगेटीव आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत 1 हजार 648 व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी 1 हजार 557 जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात...