सरकारी सवलती मिळणार नाहीत
अहमदनगर (प्रतिनिधी)- नीति आयोगाच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात खासगी रेल्वेगाड्या धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात सध्या 20 खासगी रेल्वेचे नियोजन असून त्यात परेल-शिर्डी या रेल्वेचा समावेश आहे.
ही रेल्वे आठवड्यातून तीनदा धावणार आहे. सोलापूर, पुणे, अकोला, शिर्डी आदी स्थानकांवर रेकची व्यवस्थाही झाली आहे. तसे झाल्यास नगर जिल्ह्यात खासगी रेल्वे पहिलीच असणार आहे. या रेल्वेमुळे या मार्गावरील साईबाबा भक्तांना सरकारी रेल्वे की खासगी रल्वेने प्रवास करायचा याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात शिर्डी रेल्वेचा समावेश असून त्यानंतर पुणे-पटणा ही खासगी रेल्वेही धावणार आहे. ही रेल्वे दौंड- मनमाड मार्गे धावण्याची शक्यता आहे. तसे 100 रेल्वे मार्गाची पाहणी करण्यात आली असून 150 रेल्वे सुरू करण्यात येणार आहे.
काही दिवसांत या खासगी रेल्वे धावणार आहेत. खासगी कंपन्यांना बाजार भावानुसार प्रवाशांकडून तिकिट वसूल करण्याची मुभा मिळाली आहे. गाडी कोणत्या स्थानकावर थांबवायची याचेही अधिकार त्यांना आहेत. या रेल्वे गाड्यांना 160 किमी वेगाने धावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. प्रत्येक खासगी गाडीला कमाल 16 डबे असतील.
खासगी गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभाल ही संबंधित कंपनीची जबाबदारी असेल. खासगी गाडी धावणार असलेल्या मार्गावर 15 मिनिटांच्या अंतरात भारतीय रेल्वेला आपली गाडी सोडता येणार नाही. सरकारी रेल्वेत प्रवाशांना तिकीट दरात सवलत देण्यात येते. तसेच रेल्वे पोलीस, रेल्वे कर्मचार्यांना पास आहेत. ते या खासगी रेल्वेत चालणार नाही.
रेल्वे सुंदरी…
विमानातील हवाईसुंदरीच्या धर्तीवर खासगी रेल्वेतही रेल्वे सुंदरीची नियुक्ती केली जाणार आहे. या खासगी रेल्वेत चालकापासून ते गार्ड आणि टीसीही खासगी कर्मचारीच असणार आहेत.




