बजेट सभा तहकूब : सीईंओ बजेटला मंजूरी देवून शासनाला सादर करणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर जिल्हा परिषदेची नियोजीत अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा शुक्रवारी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असणारी जमाव बंदीमुळे तहकूब करण्यात आली. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा 35 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात सात कोटींनी वाढ करण्यात आली आहे. आता या बजेटला मुख्य कार्यकारी अधिकारी मान्यता देवून राज्य सरकारकडे अवलोकनार्थ सादर करणार आहेत.
जिल्हा परिषद अधिनियमनूसार दरवर्षी 31 मार्चपूर्वी अर्थसंकल्प तयार करून तो सरकारला सादर करावा लागतो. त्यानूसार शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषदेचा 2019- 20 चे अंतिम सुधारीत व 2020-21 चे मूळ अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. पाटील यांना अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात सादर केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील हे या अर्थसंकल्पाला मंजूरी देवून राज्य सरकारला अवलोकानार्थ सादर करणार आहेत. यावेळी अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आदी उपस्थित होते.




