Sunday, September 27, 2026
HomeनगरSangamner : विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात विराट मशाल मोर्चा

Sangamner : विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात विराट मशाल मोर्चा

विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण ही हुकूमशाही - माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये समविचारी पक्ष व विविध संघटनांच्या वतीने विराट मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो युवक, विद्यार्थी, महिला व नागरिक सहभागी झाले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधान, गृहमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
संगमनेर बसस्थानकापासून सुरू झालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चावडी मार्गे महात्मा फुले स्मारकापर्यंत काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), छात्र भारती, एनएसयूआय आणि विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीहल्ला करणे ही हुकूमशाहीची प्रवृत्ती आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केंद्र सरकार करत असून युवकांनी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्षाची तयारी ठेवावी. त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करत सरकारवर जनतेचा आवाज दाबण्याचा आरोप केला. माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करत केंद्र सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला निषेधार्ह असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असताना पंतप्रधान मौन बाळगत आहेत, ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगीतले.

मोर्चानंतर झालेल्या सभेत अमोल बोराडे, तुषार पानसरे, अ‍ॅड. रंजना गवांदे, अनुराधा आहेर, अजित ओरा आदींनीही मनोगत व्यक्त केले. काँग्रेस, युवा काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, छात्र भारती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आरपीआय, कम्युनिस्ट पक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक समाज आणि इतर पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा आणि विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये काढण्यात आलेल्या विराट मशाल मोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर व तालुक्यातील हजारो महिला, युवक आणि नागरिकांनी सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शहरातून निघालेला हा मशाल मोर्चा लक्षवेधी ठरला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...