Wednesday, April 8, 2026
Homeब्लॉगलावणी

लावणी

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

संजय एकेक कला मुलांना दाखवत असतानाच आता लक्ष वेधणार्‍या कलेकडे ते आले. नृत्य, संगीत, अभिनय यांचे मिश्रण साधून लोकरंजनासाठी सादर केला जाणारा गेय काव्यप्रकार अर्थातच मलावणी ‘लवण’ म्हणजे सुंदर यावरून लावण्या हे भाववाचक नाम. ‘लावण्य’ हा संस्कृत शब्द त्याच्या सहाय्याने ‘लावणी’ ही संज्ञा. ‘लापलिका’ या संस्कृत शब्दावरून ‘लावणी’ हा शब्द. लावणी नृत्यात नर्तकी शरीर सहजपणे लववते म्हणून ती ‘लावणी’ व त्यावरून अक्षर शब्दांची शोभिवंत व सुबक जुळवणी म्हणजे ‘लावणी’.

आज जुन्यात जुनी उपलब्ध लावणी संत एकनाथ कालीन (सोळावे शतक) असून वीरशैव संत शाहीर – मन्मथ स्वामी यांच्याकडे तिचे कर्तेपण दिले जाते. ही अध्यात्मक लावणी कराड क्षेत्र वर्णनपर असून शिलाहारांची कुलदेवता महालक्ष्मी कराडत कशी आली याचे वर्णन तीत आहे. खर्‍या अर्थाने लावणीची भरभराट उत्तर पेशवाई (अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात एकोणावीसव्या शतकाच्या पूर्वार्धात) झाली. शाहीर राम जोशी, होनाजी बाळा, परशराम, सगनभाऊ, अनंत फंदी आणि प्रभाकर हे या कालखंडातील महत्त्वाचे लावणीकार शाहीर होत. राम जोशींनी संस्कृतमध्ये व अनेक भाषांत लावण्या रचल्या. इंग्रजी अमदानीत पठ्ठेे बापूराव, शाहीर हैबती, लहरी हैदर आदी अनेकांची नावे घेता येतात.

- Advertisement -

जगदीश खेबुडकर यांनी आपल्या पहिल्याच लावणीत.

नाव गाव कशाला पुसता

अहो मी आहे कोल्हापूरची

मला हो म्हणतात लवंगी मिरची

असा लवंगी ठसका त्यांनी आपल्या लावणीत उतरवला.

लावणी जनप्रिय संगीताचा एक प्रकार आहे. घरदार सोडून मुलूखगिरीवर गेलेल्या शिपायाला रमवण्यासाठी काहीशी उथळ शृंगाराची गाणी रचली जात. शिपायांच्या तळावर त्यांचे गायन होई. त्याचप्रमाणे उत्सव, जत्रा इत्यादी समूहरंजनाच्या प्रसंगातही लावण्यांसाठी मनोवेधक आविष्काराचे प्रकार आवश्यक भासत. शृंगाराचे सर्व भेद लावणीकरांनी रंगवले आहेत. परंतु पौराणिक, आध्यात्मिक आणि इतर लौकिक विषयांवरपण विपुल लावणीरचना दिसते. गणपती, शंकर-विष्णू आदी देवतांची स्तुती, एखाद्या पुराणकथेचे दीर्घकथन, तुळजापूर, पंढरपूर इत्यादी क्षेत्रांची वर्णने वैराग्यपर उपदेश, सावित्री-हरिश्चंद्र वगैरे आख्याने लक्ष्मी-पार्वती, कृष्ण-राधा संवाद, गुरुकृपा गूढ आध्यात्मिक अनुभव यांसारख्या विषयांची वर्णी लावण्यांमध्ये लागलेली दिसते. मूळची लावणी ही नृत्यासाठी लिहिले गेली नव्हती तर मूळची लावणी रचना ही साहित्यरचना होती. भेदिक लावणीमध्ये कुठे प्रश्न कोडी, उखाणे त्यांची उत्तरे असतात. त्यामध्ये कलगीतुरा हे दोन पक्ष आढळतात. आध्यात्मिक व लौकिक अशा दोन्ही विषयांवर कूटप्रश्नात्मक लावण्या रचल्या गेल्या आहेत. काही भेदिक लावण्या रूपकात्मक आहेत.

राम जोशी यांची सवाल जवाब लावणी ही तेवढीच ताकदवर आहे.

पाण्यामधील एक अप्सरा, सहज भाळली नरावर

अन् कधी कोण ते सांगून द्यावे सवालाचे उत्तर

जी … जी…. जी

जवाब

पुराणातली वांगी राहू द्या पुरानात असली रं ….

नागकन्या का उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं …..

राम जोशींनी दुष्काळावर लावणी रचावी व अनंत फंदी यांनी बदलत्या काळाविषयी खंत व्यक्त करावी यावरून लावणीच्या विषयांचा आवाका किती मोठा आहे याची कल्पना येते.

गेयतेचे बंधन लावणीने नेहमीच मानले आहे. लावणी रचना आठ मात्रांच्या पद्मावर्तनी व सहा मात्रांच्या भ्रुगावर्तनी वृत्तांमध्ये आढळते. ही जातीवृत्ते गायन सुलभ असतात.

सर्वसाधारणत: ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज यांसारखी उच्चस्वरी आणि मैदानी आविष्कारास योग्य अशी वाद्य लावणी गायनात वापरली जातात. अपवाद फक्त बैठकीच्या लावणीचा. शौर्य, प्रेम, समर्पण आणि दुःख यांसारख्या भावना व्यक्त करण्यासाठीचा हा फॉर्म योग्य आहे. लावणी ही संगीत, कविता, नृत्य आणि रंगमंचाने बनलेली असते. सर्वसाधारणतः सादरीकरण्याच्या दृष्टीने पाहता लावणीचे तीन प्रकार मानता येतील.

1) शाहिरी लावणी – डफ तुणतुण्याच्या साथीने शाहीराने पद्यमय कथन वा निवेदन पेश करण्यासाठी गायलेली लावणी उच्च स्वरांनी साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात.

2) बैठकीची लावणी – तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि माफक अभिनयाची तसेच रागसंगतीची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते.

3) फडाची लावणी – नाच्या सोंगाड्या आदी कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनयाची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणारी ‘लावणी’ (विरह दुःखाची भावना आळवणारी) छक्कड (उत्तम शृंगारिक) सवाल-जवाब (प्रश्नोत्तरयुक्त) चौकाची (दीर्घ चार कडव्यांची वाट चारवेळा चाली बदलणारी) रचना फडावर सादर केली जाते.

आजच्या तमाशातील लावणी नृत्यावर हिंदी चित्रपटातील बेगडी नृत्यप्रकार तसेच उत्तर हिंदुस्थानी कथ्थक नृत्यशैली यांचा बराच प्रभाव दिसून येतो. तरीही या नृत्य परंपरेत आढळणारे असे काही खास सौष्ठवयुक्त पदन्यास आहेत.

‘मुरळी’च्या नृत्याशी त्याचे बरेच साधर्म्य दिसून येते. ढोलकीच्या साथीने विविध प्रकारच्या कौशल्यपूर्ण ठेक्यात व जलद गतीत होणारे पदन्यास तसेच खांद्यावरून मागे सोडलेल्या नऊवारी लुगड्याचा पदर दोन्ही हातात डोक्यामागे शिडासारखा धरून केले जाणारे पदन्यास ही पारंपरिक ढंगाच्या लावणी नृत्याची खास वैशिष्ट्ये होत.

लावणीला व ती सादर करणार्‍या वर्गाला पुन्हा चांगल्या तर्‍हेने सजग करण्याचे प्रयत्न आज महाराष्ट्र सरकार तमाशा शिबिरे, महोत्सव इत्यादींचे आयोजन करून करत आहे. पारंपरिकरीतीने लावणी परंपरा जोपासणार्‍या कलावंतांना राज्य पुरस्कार देण्याची प्रथाही चालू आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध लोकनृत्य शैलींपैकी एक लावणी आहे. ‘लावणी’ महाराष्ट्राची ओळख आहे. लावणीचे दोन प्रकार म्हणजे 1) निर्गुणी लावणी (तात्त्विक) 2) शृंगारू लावणी.

आधुनिक काळात ग. दि. माडगूळकर, कवी संजीव, पी. सावळाराम, जगदीश खेबुडकर आदी गीतकारांचे लक्ष लावणीकडे वेधले गेल्यास नवल नाही. तर सर्वांनाच भावणारी

पदरावरती जरतारीचा मोर

नाचरा हवा

आई मला नेसव शालू नवा

वेड लावणारी ही ‘लावणी’

लावणीची उडती चाल आपल्याला भावून टाकत असली तरी ती फार रोमांचक आहे. आता आपण पुढच्या कलेकडे जाऊ.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : गावठी कट्टा, काडतूसासह आरोपी जेरबंद

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik परिसरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करत नाशिकरोड पोलिसांच्या (Nashik Road Police) गुन्हे शोधपथकाने एका संशयिताला अटक केली आहे. आरोपीकडून देशी...