मुंबई | Mumbai
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने आता सलमान खानला धमकी दिली आहे. सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत वरळी पोलीस गुन्हा दाखल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागच्या काही दिवसांत सलमान खानला बिश्नोई टोळीकडून तीन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर याच आठवड्यातील ही दुसरी धमकी आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला. धमकी देणाऱ्याने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीवजा मेसेज केला आहे. या मेसेजमध्ये मी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच, सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावे. नाही दिल्यास आम्ही त्याला जीवे मारू. आमची गँग आजही सक्रिय आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे. सलमान खान काळवीट शिकार प्रकरणामध्ये आरोपी आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे या प्रकरणापासून लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमक्या देण्यास सुरुवात केली. एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बिश्नोई गँगच्या अटकेत असलेल्या आरोपीने पोलिस तपासात खुलासा केला होता की, लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांना सलमान खानला जीवे मारण्यासाठी २५ कोटी रुपयांची सुपारी दिली होती. सलमानच्या मुंबई आणि पनवेल येथील फार्म हाऊसवर अनेक जणांना रेकी करण्यासाठी ठेवण्यात आले होते. सलमान खानला पनवेलच्या फार्म हाऊसवर मारण्याचा प्लॅन होता, अशीही धक्कादायक माहिती आरोपींनी पोलिस चौकशीत दिली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा