अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
काटवन खंडोबा परिसरात राहणार्या महिला वकिलाला सतत धमक्या देणार्या इसमाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयित इसमाने महिलेच्या घरात अनधिकृतरित्या शिरण्याचा प्रयत्न केला तसेच तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
महिला वकील नाजमिन वजीर बागवान (वय 34) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. फिर्यादी त्यांच्या 11 वर्षीय मुलासह राहतात. दरम्यान सोमवारी (दि. 10) किरण कोळपे हा अनधिकृतरित्या त्यांच्या घराच्या कंपाउंडवरून उडी मारून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले. यावेळी फिर्यादीला मुलाने फोनव्दारे माहिती दिली. त्यावेळी त्या फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर, घरी जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता किरण हा कार (एमएच 17 व्ही 1850) मधून दिवसभर घरावर लक्ष ठेवत असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर फिर्यादीने किरणला फोन करून या कृत्याबद्दल विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करत, तुला आणि तुझ्या मुलाला संपवील, पोलिसांनाही सोडणार नाही, अशी धमकी दिली. रात्री 9:30 च्या सुमारास फिर्यादी आपल्या मुलास सुरक्षितस्थळी नेत असताना किरण याने पुन्हा फोन करून, तू कुठे लपली आहेस? बाहेर निघ, नाहीतर गोळ्या झाडीन आणि तुझे घर पेटवून देईन, अशी धमकी दिली. तसेच, त्यांच्यासोबत असलेल्या चुलत बहिणीला देखील संपवण्याची धमकी दिली. या सततच्या धमक्यांमुळे भयभीत झालेल्या फिर्यादीने कोतवाली पोलिसांना माहिती दिली.