अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar
राज्याच्या नकाशावर राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून, 22 जून रोजी जिल्ह्याचा 18 वा आमदार कोण, याचा निकाल जाहीर होईल. दरम्यान, जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा फायदा या निवडणुकीत नेमका कोणाला होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या आमदार कोट्यातील निवडणुकीत कोपरगावचे विवेक कोल्हे आणि जामखेडचे सुनील कर्जतकर यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे जिल्ह्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. आगामी निवडणुकीत कोण कोणासोबत राहणार आणि उमेदवार महायुती किंवा महाविकास आघाडीचे असणार की वैयक्तिक संबंधांवरून ठरणार, याबाबत आतापासूनच तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, 2022 पासून रिक्त असलेली नगरची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याची आहे. या जागेवर अजित पवार गट आपला दावा कायम ठेवणार की ऐनवेळी भाजप येथे हक्क सांगणार, याबाबत सध्यातरी दोन्ही बाजूंनी मौन बाळगले आहे.
जिल्ह्यात सध्या विधानसभा, विधान परिषद आणि नाशिक पदवीधर मतदारसंघ मिळून 17 आमदार आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणखी एका आमदाराची भर पडणार असल्याने जिल्ह्यातील आमदारांची संख्या 18 होईल. राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात एवढी बलाढ्य राजकीय लॉबी पाहायला मिळत नाही. यामुळेच राज्याच्या राजकारणात नगरच्या नेत्यांचा मुंबईतील थेट संपर्क आणि प्रभाव आजही कायम असल्याचे अधोरेखित होते.
461 मतदार आणि सोयरे-धायरे पॅटर्न
या मतदारसंघात जिल्ह्यातील 11 नगरपालिका, 4 नगरपंचायती आणि महानगरपालिकेतील एकूण 461 नगरसेवक मतदार आहेत. कागदावर जरी महायुतीच्या नगरसेवकांची संख्या अधिक दिसत असली, तरी नगरच्या राजकारणातील सोयरे-धायरे (वैयक्तिक व कौटुंबिक संबंध) पॅटर्नचा प्रभाव मतदानावर पडू शकतो. तसेच भाजपमधील अंतर्गत राजकारणाचा फटका कोणाला बसणार, हे आताच सांगणे कठीण आहे. दरम्यान, पक्षीय बलाबलात महायुती जिल्ह्यात बलाढ्य दिसत असली तरी व्यक्तीगत नातेसंबंधाचा फायदा महाविकास आघाडीला होवू शकतो.
विद्यमान आमदारांची स्थिती
विधान परिषद व पदवीधर (5 आमदार) यात आ. राम शिंदे, आ. सत्यजित तांबे (नाशिक पदवीधर), आ. शिवाजीराव गर्जे, तसेच नवनिर्वाचित आ. विवेक कोल्हे आणि आ. सुनील कर्जतकर व आता 6 वा आमदार निवडला जाईल. विधानसभेचे 12 आमदार असून आता विधान परिषदेचे सहा आमदार यामुळे जिल्ह्यातील आमदारांची संख्या 18 होणार आहे.
एकाच मतदारसंघात अनेक आमदार
कोपरगाव- आ. आशुतोष काळे आणि आ. विवेक कोल्हे, संगमनेर- आ. सत्यजित तांबे आणि आ. अमोल खताळ, कर्जत-जामखेड- विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आ. रोहित पवार आणि आ. सुनील कर्जतकर तर शेवगाव-पाथर्डी मध्ये आ. मोनिका राजळे आणि आ. शिवाजीराव गर्जे यांचा समावेश आहे.
भाजपकडून सावध पवित्रा
निवडणूक जाहीर होताच संभाव्य उमेदवारीबाबत भाजपच्या गोटातून अत्यंत सावध प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार गटाकडून किंवा अपक्ष म्हणून राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, ऐनवेळच्या राजकीय खेळीत भाजपकडून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव समोर येण्याची दाट शक्यता आहे. सध्यातरी कोणत्याही पक्षाने आपले पत्ते उघड केलेले नाहीत.
महाविकास आघाडीकडून थोरात की गडाख ?
महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. थोरात स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास महायुतीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि कठीण जाण्याची शक्यता आहे. थोरात यांच्या संपर्काचा आणि सोयरे-धायरे समीकरणांचा फटका महायुतीला बसू शकतो; शिवाय महायुतीमधील एक गट त्यांना छुपी ताकद देण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. जर थोरात यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला, तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नावाचा आग्रह धरला जाऊ शकतो. गडाख यांच्या सर्वपक्षीय संबंधांचा फायदा आघाडीला मिळू शकतो, लवकर विधान परिषदेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे.





