आरडगाव (वार्ताहर)
राहुरी तालुक्यातील मानोरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी घडली आहे. विठ्ठल रामभाऊ हापसे असे जखमी झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आज रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मानोरी येथील हापसे वस्तीवर एका शेतात ऊस तोड सुरू असताना ऊस तोड कामगारांना हा बिबट्या शेतात दिसला. त्यांनी ही माहिती शेतकर्यांना दिली. त्यानंतर या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील शेतकर्यांनी मोठी गर्दी केली. मात्र, दबा धरून बसलेल्या बिबट्याने जमावातील एका शेतरकर्यावर हल्ला चढविला.
या हल्ल्यात शेतकरी हापसे यांच्या हाताला व दंडाला गंभिर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्यांना वैद्यकिय उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मानोरी परिसरात मोठी दहशत पसरली असून या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.