आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी येथील देवीचा मळा म्हणून ओळख आलेल्या भागातील शेतकरी महादेव भिवराज गिते यांच्या घरासमोरील शौचालयात भक्ष्याचा पाठलाग करताना मादी बिबट्या अडकला. सदर घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. त्यास वनविभागाने पिंजर्यात जेरबंद केले.
सविस्तर वृत्त असे, भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने मादी बिबट्या शौचालयात अलगदपणे अडकली. बाहेर येण्याच्या प्रयत्नात बंद झालेल्या दरवाजाला मादी धडका घेत राहिली. या धडकेचा आवाज आल्याने शेतकरी गिते यांना जाग आली असता त्यांनी बिबट्या अडकल्याचे पाहिले. त्यांनी प्रसंगावधान राखत दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि तत्काळ याबाबत वनाधिकारी हरिश्चंद्र जोजर यांना माहिती दिली. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग तीनचे सुभाष सांगळे यांना सूचना दिल्या.
घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ बिबट रेस्क्यू टीम सज्ज करून वनपरिमंडळ अधिकारी सुहास उपासनी यांच्या नेतृत्वात संतोष पारधी, गजानन पवार, वाहन चालक रामभाऊ वर्पे यांच्या पथकाने मादी बिबट्याला शिताफीने पिंजर्यात जेरबंद केले. बिबट्या पिंजर्यात आल्याचे समजताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.