Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिन्नर तालुक्यातील मीठसागरे शिवारात बिबट्या जेरबंद

सिन्नर तालुक्यातील मीठसागरे शिवारात बिबट्या जेरबंद

अजूनही सात-आठ बिबटे असण्याची शक्यता

पंचाळे | वार्ताहर Panchale

वन विभागाकडून सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील पंचाळे व शहा परिसरात लावण्यात आलेल्या ९ पिंजर्‍यांपैकी मीठसागरे शिवारातील पिंजर्‍यात आज (दि.१६) दुपारी एक बिबट्या जेरबंद झाला. मात्र परिसरात अजूनही ७ ते ८ बिबटे असल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तूर्तास एक बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकर्‍यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

- Advertisement -

गेल्या दहा दिवसांपासून पुर्व भागात बिबट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. पंचाळे येथे ११ वर्षीय शाळकरी मुलाचा तर निमगाव देवपूर शिवारात दीड वर्षाचा बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. एका बालकासह एका महिलेवरही बिबट्याकडून हल्ला झाल्याची घटना या दिवसांत घडली होती. त्यामुळे पूर्वभागातील शेतकर्‍यांमध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे.

या घटनांनंतर वनविभागाकडून या बिबट्यांना पकडण्यासाठी मोठा फौजफाटा उभा करण्यात आला आहे. वनविभागाचे सेवक दिवसरात्र बिबट्याचा शोध घेत होते. मात्र, तरीही बिबट्या हाती लागत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये बिबट्याची दहशत कायम होती. पंचाळे शिवारातील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून ठिकठिकाणी आठ पिंजरे लावण्यात आले आहे. त्यापैकी शहा भागात दोन पिंजरे लावलेले असून उजनी-मीठसागरे रस्त्यालगत असलेल्या रामदास लहानु चतुर यांच्या शेतात लावलेल्या पिंजर्‍यात काल एक बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मीठसागरेचे माजी पोलीस पाटील दिनकर चतुर यांची उजनी रस्त्यालगत पश्चिम भागात वस्ती आहे. त्यांच्या वस्तीलगत असलेल्या रामदास चतुर यांच्या शेतामध्ये चार दिवसापासून बिबट्याचा वावर सुरू होता. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना बाहेर पडणे देखील मुश्किल झाले होते. त्यामुळे वनविभागाकडून याठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजर्‍यामध्ये सावज म्हणून ब्रॉयलर कोंबडी ठेवण्यात आली होती.

आज दुपारी बिबट्या कोंबडीला खाण्यासाठी पिंजर्‍याजवळ गेला अन् अलगद पिंजर्‍यात अडकला. पिंजर्‍यात अडकल्यानंतर बिबट्या पिंजर्‍याला धडक देत डरकाळ्या फोडू लागल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी जवळ बघितले असता पिंजर्‍यात बिबट्या अडकल्याचे दिसून आले. त्यावर सुनील दिनकर चतुर यांनी वन विभागास माहिती दिली. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी तत्काळ तेथे पोहचत आढावा घेतला.

यावेळी बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला नाशिक येथील वनविभागाच्या शेल्टर कॅम्पमध्ये हलवले आहे. त्यानंतर त्याला कुठे सोडायचे याबाबत वरिष्ठ अधिकारी निर्णय घेणार आहेत. परिसरात अजूनही अनेक बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून सध्या परिसरातील एक बिबट्या जरेबंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पिंजर्‍यातील कोंबडी जिवंत
बिबट्याला सावज म्हणून पिंजर्‍यात ठेवण्यात आलेली कोंबडी बिबट्या पिंजर्‍यात अडकल्यानंतरही जिवंत होती. कोंबडीला पकडण्यासाठी बिबट्या पिंजर्‍यात घूसताच तो जेरबंद झाला. त्यामुळे बिबट्या घाबरल्याने त्याने कोंबडीला काही केले नाही. त्यानंतर बिबट्या पिंजर्‍यात डरकाळ्या फोडत असतानाही कोंबडी मस्त बसून धान्य खात असल्याचे दिसून आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...