Wednesday, May 6, 2026
Homeनगरखत खरेदीवर अनावश्यक वस्तूची सक्ती केल्यास परवाने रद्द करणार

खत खरेदीवर अनावश्यक वस्तूची सक्ती केल्यास परवाने रद्द करणार

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कृषी विभागाला कडक निर्देश

राहाता |प्रतिनिधी| Rahata

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित नियोजन बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी सेवा केंद्रांच्या मनमानी कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, शेतकर्‍यांना अनावश्यक वस्तू खरेदीची सक्ती केल्यास संबंधित केंद्रांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. कृषी सेवा केंद्रांबाहेर खतांचा साठा व दर दर्शविणारे फलक लावणे अनिवार्य करून कामकाजात पारदर्शकता आणावी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती पुस्तिकांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

- Advertisement -

राहाता तहसील कार्यालयात आयोजित या बैठकीस अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, राहाता नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आणि तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ना. डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, हवामान बदलाच्या संकटात पिके टिकवण्यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना 85 ते 90 दिवसांत येणार्‍या वाणांची शिफारस करावी. कृषी सहाय्यकांचे संपर्क क्रमांक ग्रामपंचायतीबाहेर प्रदर्शित करावेत जेणेकरून शेतकर्‍यांना वेळेत मदत मिळेल. मजुरांची टंचाई लक्षात घेता फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी गावागावांत अवजार बँका स्थापन करण्यावर भर द्यावा. तसेच, शेतीमालाचे बाजारभाव समजण्यासाठी क्यूआर कोड तयार करून तो सर्वत्र प्रदर्शित करावा, अशी नाविन्यपूर्ण सूचनाही त्यांनी केली. पीक कर्जवाटपाबाबत बँकांच्या अडवणुकीच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, सिबिल स्कोअरची अट लादणार्‍या शाखाधिकार्‍यांवर थेट कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

बैठकीत सौर कृषी पंप आणि कंत्राटदारांकडून होणार्‍या पाईपलाईनच्या नुकसानीबाबत त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. विशेषतः पंचायत समितीमार्फत मंजूर झालेल्या विहिरींच्या यादीत तफावत दिसून आल्याने, याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकर्‍यांना 24 तास मदत मिळण्यासाठी तहसीलदारांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. रासायनिक खतांचा अतिवापर टाळण्यासाठी नॅनो युरियाच्या वापराचे प्रात्यक्षिक थेट बांधावर जाऊन द्यावे आणि आधुनिक शेती करणार्‍या प्रगतशील शेतकर्‍यांच्या यशोगाथा माहितीपत्रकात प्रसिद्ध कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीपूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि कृषी ड्रोनचे वाटप करण्यात आले, ज्यात शशिकला दंडवते, रमेश बनसोडे, विशाल वहाडणे यांसह अनेक लाभार्थी शेतकर्‍यांचा गौरव करण्यात आला.

ताज्या बातम्या

टाकळीभान-नेवासा मार्गावर दुचाकींचा भीषण अपघात; धडक देऊन दुचाकीस्वार पसार, एकजण गंभीर...

0
टाकळीभान (प्रतिनिधी) रस्त्यावरील बेफाम वेगाचा आणि माणुसकी हरवलेल्या वृत्तीचा प्रत्यय देणारी एक घटना टाकळीभान-नेवासा राज्यमार्गावर घडली आहे. लोखंडी फाॕल परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक...