अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात आठ वर्षांच्या बालिकेशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पीडित बालिकेच्या आजोबा विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) 2012 मधील कलम 8 आणि 12 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (20 ऑक्टोबर) सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घराजवळ घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी महिलेची आठ वर्षांची मुलीला संशयित आरोपी तिच्या आजोबाने चारचाकी वाहनात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्या अंगाला स्पर्श करत अश्लील कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पीडित बालिकेसोबत केलेल्या कृत्याची माहिती फिर्यादीला मिळाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. दरम्यान, पोलिसांनी पीडित बालिकेच्या आईची फिर्याद नोंदवून घेत आजोबाविरोधात गुन्हा दाखल केला असून तो पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत.




