Thursday, May 7, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणूक तयारीचा आज आढावा

Ahilyanagar : ‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणूक तयारीचा आज आढावा

राज्य निवडणूक आयोग नाशिक विभागाच्या दौर्‍यावर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘निवडणूक आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत निवडणूक आयोगाचे प्रमुख अधिकारी आज, मंगळवार (दि. 5 ऑगस्ट) रोजी नाशिकला भेट देणार आहेत. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडून निवडणूक तयारीबाबत सविस्तर माहिती घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली असून, त्याअंतर्गत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी तालुका पातळीवरून आवश्यक माहितीचे संकलन करण्यात आले असून, ही माहिती जिल्हा निवडणूक शाखा व ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत तयार करण्यात आली आहे. याचे सादरीकरण आयोगासमोर करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर, यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 11 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे निवडणूक तयारीबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष भेटीव्दारे विभागीय पातळीवर निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला जाणार आहे. नाशिक विभागातील आढावा बैठक आज सकाळी 11 वाजता सुरू होणार असून, यामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्याबाबतचा आढावा घेतला जाईल. तसेच दुपारी 3.30 वाजता महापालिकांबाबत स्वतंत्र सत्रात चर्चा केली जाणार आहे.

या बैठकीस राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, तसेच विशेष कार्य अधिकारी अ. गो. जाधव उपस्थित राहणार आहेत. तसेच विभागीय आयुक्त, नाशिक, तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तसेच नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर व मालेगाव महापालिकांचे आयुक्त देखील या बैठकीसाठी उपस्थित राहतील. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या, मतदार यादीचे विभाजन, मतदान केंद्रांची संख्या, मतदान यंत्र व अन्य साहित्याची उपलब्धता, मतदान केंद्रांवरील भौतिक सुविधा, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान कर्मचार्‍यांची नियुक्ती व उपलब्धता याचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Shrirampur : निर्मळपिंपरी बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणी श्रीरामपुरातील डॉ. कुटेसह दोन...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घालत, श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठीत...