पुणे । Pune
लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याला ढकलून दिल्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी या गुन्ह्याची अंगावर काटा आणणारी धक्कादायक पार्श्वभूमी समोर येत आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने १८ जून रोजी हे हत्याकांड घडवून आणले होते. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या सियाने चौकशी दरम्यान दिलेली कबुली ऐकून कसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. केवळ होणाऱ्या पतीसोबत एकाच खोलीत राहणे (नाईट स्टे) टाळण्यासाठी सियाने थेट त्याचा काटा काढण्यापर्यंतची क्रूर मजल मारल्याचे तपासात उघड झाले आहे.
विवाहसोहळ्याची दोन्ही कुटुंबांकडून जय्यत तयारी सुरू झाली होती. लग्नाचे हॉल आणि इतर सर्व बुकिंग पूर्ण झाले होते. दरम्यान, १९ जून रोजी सियाचा वाढदिवस होता. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस खास आणि संस्मरणीय ठरवण्यासाठी केतनने महाबळेश्वर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये खास सेलिब्रेशन आणि मुक्कामाचे (नाईट स्टे) नियोजन केले होते. मात्र, या ट्रिपदरम्यान केतनसोबत एकाच खोलीत राहावे लागेल, या विचाराने सिया प्रचंड अस्वस्थ झाली होती. केतनसोबतचा हा मुक्काम कोणत्याही परिस्थितीत टाळायचा, याच एका विकृत मानसिकतेतून तिने वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनचा गेम करण्याचा अंतिम कट प्रियकर चेतनच्या मदतीने अमलात आणला.
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत समोर आले आहे की, केतनसोबत राहणे टाळण्याची सियाची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी ६ जून रोजी हे जोडपे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी ‘बाली’ (इंडोनेशिया) येथे जाणार होते. विमानाची तिकिटे आणि हॉटेल बुकिंग सर्व काही निश्चित झाले होते. मात्र, बाली दौऱ्यात केतनसोबत राहावे लागेल या भीतीने सियाने एक कुटील डाव आखला होता. तिने केतनला सुगावा लागू न देता गुपचूप त्याच्या बॅगेतून त्याचा पासपोर्ट चोरला आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर फूड मॉलच्या स्वच्छतागृहात फेकून दिला. पासपोर्ट अचानक गहाळ झाल्यामुळे केतनला बाली दौरा रद्द करावा लागला होता आणि सियाचा तो प्लॅन यशस्वी ठरला होता.
बाली दौरा यशस्वीपणे रद्द केल्यानंतर सियाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. मात्र, त्यानंतर लगेचच समोर आलेल्या महाबळेश्वरच्या मुक्कामाचे संकट टाळण्यासाठी तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. अखेर, केतनसोबत एका खोलीत राहण्यापेक्षा तिने त्याला जगातूनच कायमचे हटवण्याचा सर्वात भयानक मार्ग निवडला. लोणावळा ग्रामीण पोलीस या संपूर्ण धक्कादायक कबुलीनंतर न्यायालयासमोर पक्के पुरावे सादर करण्यासाठी आणि गुन्ह्याची साखळी जोडण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.




