Wednesday, April 29, 2026
Homeक्राईमKopargav : ‘दामदुप्पट’चे अमिष दाखविणार्‍या ठकसेन ईश्वरप्रसाद शिंदेला अटक

Kopargav : ‘दामदुप्पट’चे अमिष दाखविणार्‍या ठकसेन ईश्वरप्रसाद शिंदेला अटक

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील महिलेचे 4 लाख रुपये 90 दिवसांत दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून कोपरगाव, शिर्डी व राहाता परिसरातील नागरिकांची फसवणूक करणार्‍या ईश्वरप्रसाद सुदाम शिंदे (रा. साहीलनगर, गोविंदपुरा, जि. अहिल्यानगर) याला कोपरगाव शहर पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली. शिर्डी येथील ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे फसवणुकीचे प्रकरण ताजे असताना कोपरगावात हा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दि. 12 जुलै 2025 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी अनीसा असद शेख (रा. समतानगर, ता. कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ईश्वरप्रसाद सुदाम शिंदे (रा. गोविंदपुरा, ता. , जि. अहिल्यानगर) याने फिर्यादी अनीसा शेख यांच्यासोबत ओळख निर्माण करून त्यांना विश्वासात घेऊन 90 दिवसांत पैसे दाम दुपट करून देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 2 लाख रुपये रोख व दोन लाख रुपये फोन-पे द्वारे असे एकूण 4 लाख रुपये घेतले. त्यानंतर तो पसार झाला. याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे कलम 316 (2), 318 (4) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत पो. नि. रामकृष्ण कुंभार यांच्या आदेशाने श्रीरामपूर सायबर सेलच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा टेक्निकल ऑनलाइनद्वारे मागोवा घेतला असता आरोपी पंढरपूर, जि. सोलापूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर, पो.कॉ. भांगरे आणि पो.कॉ. सुंबे यांनी पंढरपूर येथे जाऊन सदर आरोपीचा मोबाईल लोकेशनद्वारे शोध घेत असताना सदर आरोपी हा सांगोला रोड, ता. पंढरपूर येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.

आरोपीला ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता आरोपीने कोपरगाव, शिर्डी, राहाता परिसरात देखील आणखी काही लोकांकडून पैसे दामदुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याबाबत अधिक चौकशी पोलीस करीत आहेत. सदर यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पो.हे.कॉ. बबन तमनर, पो. कॉन्स्टेबल भांगरे, पो. कॉन्स्टेबल सुंबे तसेच श्रीरामपूर सायबर सेलचे पो.हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर, पोलीस नाईक धनाड, पो. कॉन्स्टेबल वेताळ यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा; विवेक कोल्हेंचा समावेश

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai येत्या 12 मार्च रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी रात्री उशीरा पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीतून भाजपने...