Tuesday, May 5, 2026
HomeनगरPathardi : मढी देवस्थानच्या तिजोरीची चावी देण्यास माजी अध्यक्षांचा नकार

Pathardi : मढी देवस्थानच्या तिजोरीची चावी देण्यास माजी अध्यक्षांचा नकार

नवीन विश्वस्त मंडळाचे धर्मादाय आयुक्तांना पत्र, सोने-चांदी ठेवण्याची मोठी अडचण

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

राज्यभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थानच्या मढी यात्रा यावर्षीच्या उत्सवात कानिफनाथ महाराजांना मुकुटासह सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने घालता आले नाहीत. कारण ते सर्व दागिने देवस्थानच्या स्ट्राँगरूममध्ये आहेत. अन स्ट्राँग रूमची एक चावी माजी अध्यक्ष संजय मरकड यांच्याकडेच आहे. अनेक वेळा मागणी करून त्यांनी अजूनही जमा केली नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. नवीन विश्वस्त मंडळाने याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, तरीही अद्याप चावी मिळाली नसल्याने यात्रा काळातील मौल्यवान दागिने ठेवण्यास देवस्थान समितीला मोठी अडचण झाली असून यामुळे नाथ भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मात्र नवीन विश्वस्त मंडळाने देणग्यांची सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या उपाययोजना केल्यामुळे यात्रेचा उत्सव यशस्वीपणे पार पडला.

- Advertisement -

देवस्थानाचे नवीन विश्वस्त मंडळ गेल्या महिन्यात जानेवारी 2026 मध्ये सत्तेत आले असून, त्यापूर्वी संजय मरकड हे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. देवस्थानाच्या स्ट्राँग रूममध्ये लाखों रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, मुकुट आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात. या स्ट्राँग रूमच्या सुरक्षिततेसाठी तीन चाव्यांची व्यवस्था आहे. एक अध्यक्षाकडे, दुसरी कोषाध्यक्षाकडे आणि तिसरी व्यवस्थापकाकडे. एकाच वेळी तिन्ही चाव्या लावल्याशिवाय रूम उघडता येत नाही. माजी अध्यक्ष मरकड यांनी पद सोडल्यानंतर आपल्याकडील चावी जमा केली नसल्याने नवीन विश्वस्त मंडळाला रूम उघडणे शक्य झालेले नाही. नवीन विश्वस्त मंडळाने मरकड यांना चावी जमा करण्यासाठी एकूण पाच वेळा पत्रव्यवहार केला आहे.

मागील मंडळाने तीन वेळा आणि सध्याच्या मंडळाने दोन वेळा पत्रे पाठवली, मात्र मरकड यांनी ही पत्रे स्वीकारलीच नाहीत. यंदाच्या यात्रेदरम्यान भाविकांनी सुमारे पाच किलो चांदीच्या दागिन्यांची देणगी दिली असून, ती तात्पुरत्या सुरक्षित जागेत ठेवण्यात आली आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी कानिफनाथांच्या मूर्तीला चांदीचा मुकुट घालता न आल्याने फेटा बांधावा लागला, ज्यामुळे नाथभक्तांमध्ये निराशा व्यक्त झाली. मात्र, नवीन विश्वस्त मंडळाने तात्काळ व्यवस्था करून यात्रेचा उत्सव निर्विघ्न पार पाडला, ज्यामुळे लाखो भाविकांचा सहभाग वाढला.

या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता, नवीन विश्वस्त मंडळाने धर्मादाय आयुक्तांकडे पत्र देऊन मरकड यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पत्रात म्हटले आहे की, मरकड यांनी व्यवस्थापकाकडून चावी घेऊन ती आपल्याकडे ठेवली असून, कार्यकाळ संपल्यानंतरही जमा केली नाही. मढी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असलेले मरकड यांच्या या भूमिकेमुळे देवस्थानाच्या कारभारात अडथळा येत असल्याचे विश्वस्त मंडळाने नमूद केले आहे. याबाबत मरकड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रत्युत्तर मिळालेले नाही.

तात्पुरती व्यवस्था
मढी यात्रेदरम्यान देवस्थानाला लाखो रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू मिळतात. स्ट्राँग रूम उघडता न आल्याने तात्पुरत्या सुरक्षित जागा आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली देणग्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. नवीन विश्वस्त मंडळाने केलेल्या या उपाययोजनांमुळे कोणतीही नुकसानकारक घटना घडू दिलेली नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ ५ नावांची चर्चा!

0
कोलकाता । Kolkata गेल्या अनेक दशकांतील प्रस्थापित राजकारणाला सुरुंग लावत भारतीय जनता पक्षाने बंगालच्या भूमीत एक नवा इतिहास रचला आहे. जाहीर झालेल्या निवडणूक निकालांनुसार, भाजपने...