मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांसाठी महालॅब, मोफत डायलिसिस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य सेवा पुरविणाऱ्या ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ या कंपनीची जवळपास ११०० कोटी रुपयांची देणी राज्य सरकारने थकवली आहेत. त्यामुळे कंपनीने १ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील आपल्या आरोग्य सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील रुग्ण मोफत आरोग्य सेवेपासून वंचित राहू लागले आहेत.
‘एनएचएम’ अंतर्गत राज्याच्या आरोग्य विभागाने ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ सोबत १० वर्षांचा करार केला होता. या करारानुसार गेल्या ७ वर्षांपासून कंपनीकडून सुमारे ४०० महालॅब, २२५ आपला दवाखाने आणि ११० डायलिसिस केंद्रे चालविण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सामान्य नागरिकांना सीबीसी, थायरॉईड, बायोकेमिस्ट्रीसारख्या मोफत चाचण्या मिळत होत्या. आपला दवाखानाच्या माध्यमातून मोफत उपचार तसेच डायलिसिस केंद्रांच्या माध्यमातून मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना दिलासा मिळत होता.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारकडून देयक मिळाले नसल्याने या सेवा चालवणे कठीण झाल्याचे कंपनीने गेल्या महिन्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला कळविले. गेल्या दोन वर्षात १ हजार ६७ कोटींचे देयक थकल्याने ४ हजारांहून अधिक कर्मचार्यांचे वेतन रखडले आहे. याशिवाय डायग्नोस्टिक किट्स आणि आवश्यक साहित्य खरेदी करणे अशक्य झाले आहे. देयकांबाबत कंपनीने सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, सरकारकडून दाद मिळत नसल्याने शेवटी कंपनीने रविवारपासून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.
थकबाकी किती
कंपनीच्या दाव्यानुसार, सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रयोगशाळा निदान सेवांचे ८७७.१५ कोटी रुपये, मोफत डायलिसिस सेवांचे १२६.२७ कोटी रुपये आणि आपला दवाखाना प्रकल्पाचे ६३.८३ कोटी रुपये अशी एकूण १ हजार ६७ कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप चॅनेलला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा



