Friday, April 25, 2025
Homeक्राईममहालक्ष्मी मंदिरातील 51 तोळे सोने चोरणारी संगमनेर आणि अकोलेची टोळी जेरबंद

महालक्ष्मी मंदिरातील 51 तोळे सोने चोरणारी संगमनेर आणि अकोलेची टोळी जेरबंद

अहिल्यानगरला जात असताना लोणी-कोल्हार रस्त्यावर पोलिसांची कारवाई

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

काकडवाडी (ता. संगमनेर) येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करत 26 लाख 12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महालक्ष्मी माता मंदिराचा 8 मार्च रोजी अज्ञात चोरट्याने दरवाजा व गाभार्‍याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप, टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असे एकूण 24 लाख 94 हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेल्याचा संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

याची गांभीर्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींची गुन्हा करण्याच्या कार्यपध्दतीची माहिती घेवून तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सागर ससाणे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांचे पथक तयार करुन आरोपीची माहिती काढणेकामी पथकास आवश्यक सूचना देवून रवाना केले.

या पथकाने घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना 13 मार्च रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे (रा.हिवरगाव पावसा, ता.संगमनेर) याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने बातमीदारामार्फत सुयोग दवंगे याची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक याच्या मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाच्या कारमधून (क्र.एमएच-04, एचएफ-1661) संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने तत्काळ लोणी ते कोल्हार रस्त्यावर सापळा लावला असता संशयित कार मिळून आल्याने त्यातून तिघे इसम पळून जाऊ लागले. पथकातील काही अंमलदारांनी त्याचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकूण सहा इसमांना ताब्यात घेतले असता त्यांनी सुयोग अशोक दवंगे (वय 21, रा.हिवरगाव पावसा, ता.संगमनेर), संदीप किसन साबळे (वय 23, रा.पाचपट्टावाडी, ता.अकोले), संदीप निवृत्ती गोडे (वय 23, रा.सोमठाणे, ता.अकोले), अनिकेत अनिल कदम (वय 21, रा.टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे), दीपक विलास पाटेकर (वय 24, रा.टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे), सचिन दामोदर मंडलिक (वय 29, रा.संगमनेर, ता.संगमनेर) अशी नावे असल्याचे सांगितले.

पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता 26 लाख 12 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 199 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने, 1665 ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने, 3 मोबाईल व एक कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दवंगे याने कुंदेवाडी (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथील बालाजी मंदिर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रस्त्यावरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याची माहिती सांगितली. चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन मंडलिक याच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती दिली. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलिसांत हजर करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...