नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे टॉवर उभारणी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची विश्वविंड ते भेंडा 220 केव्ही इलेक्ट्रिक लाईनचे कामकाज खाजगी ठेकेदाराच्यावतीने मागील चार वर्षांपासून चालू आहे.
शुक्रवार 14 फेब्रुवारी रोजी बंडू रामहरी ठुबे यांच्या मालकीच्या शेतात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्यावतीने बइलेक्ट्रिक लाईनचा मनोरा उभारण्याकरिता पोलीस बंदोबस्तात कामकाज सुरू असताना संजय रामहरी ठुबे व बंडू रामहरी ठुबे यांच्या कुटुंबातील बाळासाहेब रामहरी ठुबे, आदित्य बंडू ठुबे, रमेश बाळासाहेब ठुबे, महेश बंडू ठुबे, भीमाताई रामहरी ठुबे, चंद्रकला रामहरी ठुबे व इतर तीन ते चार महिला सर्व रा. सौंदाळा या व्यक्तीनी येऊन मनोरा उभारणीच्या कामकाजासाठी आणलेल्या मशिनरीच्या पुढे आडवे येऊन कामकाज बंद पाडले. त्यावेळी पोलिसांनी बाळासाहेब रामहरी ठुबे, रमेश बाळासाहेब ठुबे, आदित्य बंडू ठुबे या तिघांना तात्काळ ताब्यात घेऊन आकाश शंकर हुच्चे (वय 31), सहाय्यक अभियंता, बाभळेश्वर यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रामहरी ठुबे, आदित्य बंडू ठुबे, रमेश बाळासाहेब ठुबे, महेश बंडू ठुबे, भीमाबाई रामहरी ठुबे, चंद्रकला रामहरी ठुबे यांच्या विरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवणे, शासकीय कामकाजात आडकाठी करणे, शासकीय नोकरांना धक्काबुक्की करणे, आत्मदहन करण्याची भीती घालणे इत्यादी अपराधाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेवासा पोलिसांनी संजय रामहरी ठुबे यांना भारतीय न्याय संहिता कलम 170 अन्वये 24 तास डिटेन केले होते. त्यानंतर त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्रीरामपूर यांच्या समक्ष चांगल्या वर्तणुकीचा मुचलका घेण्यासाठी हजर करण्यात आले आहे. याप्रकरणी शासनाच्या लोकहिताच्या या योजनेस अद्याप पर्यंत कोणत्याही न्यायालयाचा किंवा प्राधिकरणाचा मनाई संलग्न स्थगित हुकूम आदेश नाही. शासनाच्या लोकहिताच्या योजनांच्या आड विनाकारण कोणीही येऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पोलीस ठाणे नेवासा यांनी केले आहे.
योग्य मोबदला द्या – चंद्रकला ठुबे
दरम्यान याबाबत चंद्रकला ठुबे म्हणाल्या, आमच्या पिकाची व शेताची नुकसान भरपाई फारच कमी देत आहेत. आमचा विरोध असूनही बळजबरीने हे लोक आमच्या शेतात आले आहेत. योग्य मोबदला द्यावा, असे चंद्रकला ठुबे म्हणाल्या.