अहिल्यानगर (प्रतिनिधी)
कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाली की शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात संपर्क साधण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर पर्याय म्हणून आता महावितरणप्रमाणे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनाही १३ हजार १४१ मोबाइल सिम कार्ड (सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल) वाटण्यात आले. बदली झाली की संबंधित अधिकारी हे सिम कार्ड त्यांच्या जागेवर रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांची अडचण दूर होईल, असा दावा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यातील मुख्यालयासह १४ तालुक्यात कृषी विभागाकडून असे कायम स्वरूपी ७४८ मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात करून देण्यात येणार आहेत. कृषी विभागामध्ये अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा थेट शेतकऱ्यांशी संबंध खूप कमी येतो, अधिकारी फोन उचलत नाहीत किंवा अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर संपर्कास अडचणी येतात, अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. यावर मात करण्यासाठी आता कृषी विभागाने महावितरणच्या धर्तीवर कृषी विभागातील जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांना कायम स्वरूपी मोबाईल नंबर देण्याचा निर्णय घेतला आहे. या नंबरमुळे संबंधीत अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतरही तो नंबर सुरू राहणार असून तो नव्याने बदली झालेल्या त्याच पदावरील अधिकाऱ्याकडे कार्यरत राहणार आहे.
याबाबतचे आदेश कृषी संचालक अंकूश माने यांनी काढले आहेत. यात कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या एका सिम कार्डसाठी प्रति महिना १९५.३० रुपये खर्च येणार आहे. यामुळे दर महिन्याला कृषी विभागाला २४ लाखांचे बिल भरावे लागणार आहे. शेतकऱ्यांना संवाद साधण्यास सोपे व्हावे, म्हणून राज्यातील सर्व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना हे सिम कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची बदली झाली तरीही त्या जागेवर येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना तो नंबर किंवा सिम कार्ड हस्तांरित होणार आहे.
एमएसईबीचा पॅटर्न
शेतकऱ्यांना पिकांबाबत मार्गदर्शनाची गरज असेल आणि अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक बदलला तर अडचणींचा सामना करावा लागतो. शेतीच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. अधिकाऱ्यांकडे एकच मोबाईल क्रमांक असल्यास संपर्क साधणे सोयीचे होते, अशी मागणी सुरू होती. ही अडचण दूर करण्यासाठी महावितरणने काही वर्षांपूर्वीच त्यांच्या अधिकाऱ्यांना सिम कार्ड वाटप केले. आता हाच पॅटन कृषी विभागानेही लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी जरी बदलला तरी फोन नंबर तोच असावा यासाठी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १३ हजार १४१ सिम कार्डचे वाटप करण्यात आले.




