Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रHSC Result : बारावीचा निकाल जाहीर! कोकण विभाग अव्वल, दरवर्षीप्रमाणे मुलींचा डंका

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर! कोकण विभाग अव्वल, दरवर्षीप्रमाणे मुलींचा डंका

मुंबई । Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये असलेली धाकधूक अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून विभागांमध्ये ‘कोकण’ विभाग अव्वल ठरला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची अधिकृत घोषणा केली.

- Advertisement -

यंदा राज्याचा बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. राज्यातून पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून तब्बल १४ लाख ४४ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही निकालात मुलींचे वर्चस्व पाहायला मिळाले. मुलींचा निकाल ९३.१५ टक्के लागला असून मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६.३५ टक्क्यांनी जास्त आहे.

विभागीय निकालाचा विचार करता, निसर्गरम्य कोकण विभागाने पुन्हा एकदा शिक्षणात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९४.१४ टक्के लागला आहे. दुसरीकडे, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (८४.१४ टक्के) लागला असून या विभागात यंदा निकालाची टक्केवारी घटल्याचे चित्र आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

  • दिव्यांग विद्यार्थ्यांचे यश: यंदा ८,४४६ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ७,५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ९०.५८ इतकी आहे.
  • विषयनिहाय निकाल: राज्य मंडळाच्या एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे, ही एक महत्त्वाची बाब मानली जात आहे.
  • पुनर्परीक्षार्थी: ५०,३४६ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १८,३४९ विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यांची टक्केवारी ३६.४४ आहे.
  • खाजगी विद्यार्थी: खाजगीरीत्या फॉर्म भरलेल्या ३६,९४१ विद्यार्थ्यांपैकी ८०.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बोर्डाने सकाळी पत्रकार परिषदेत आकडेवारी जाहीर केली असली, तरी विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल आज दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचा बैठक क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव टाकणे आवश्यक आहे.

उमंग ॲपवर निकाल कसा तपासावा

  • उमंग ॲप डाउनलोड करा.
  • तुमच्या मोबाईल नंबरने नोंदणी करा.
  • ॲपमध्ये ‘महाराष्ट्र बोर्ड सर्व्हिसेस’ शोधा.
  • ‘एचएससी निकाल २०२६’ हा पर्याय निवडा
  • तुमचा निकाल पाहण्यासाठी तुमचा तपशील सादर करा.
  • तुमची गुणपत्रिका डाउनलोड करा.

ताज्या बातम्या

गणेश

पुढच्या वर्षी लवकर या! लाडक्या बाप्पाला निरोप; नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला...

0
नाशिक | प्रतिनिधीआज गणेशविसर्जनाची राज्यभरात धूम पाहायला मिळतेय. यात हजारोंच्या संख्येने लोक हे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात.यंदा बारा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर लाडक्या गणरायाला निरोप...