Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकMaharashtra Cabinet Expansion : आ. नरहरी झिरवाळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion : आ. नरहरी झिरवाळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ

ओझे | विलास ढाकणे | Oze

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पराभवानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार कमबॅक करत अभूतपूर्व यश मिळवले. राज्यात महायुतीला २३५ जागांवर घवघवीत बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला मात्र ४९ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर तब्बल १२ दिवसांनी म्हणजेच ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर (आज दि.१५ डिसेंबर) रोजी नागपूर (Nagpur) येथील राजभवनात मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला.

- Advertisement -

यात भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्र्‍यांनी शपथ घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता एकूण ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्री असणार आहेत. आज शपथ घेतलेल्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातून तीन जणांनी कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यामध्ये मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांनी शिवसेनेच्या तर दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

नरहरी झिरवाळ (Narahari Zirwal) हे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातून चौथ्यादा निवडून आले आहे. मागील काळात त्यांची विधानसभा उपाध्यक्ष पदावर नेमणूक केली होती.आदिवासींच्या प्रश्नासाठी त्यांनी विधानसभेतील (Vidhansabha) जाळ्यांवर उडी मारली होती व सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यामुळे आता त्यांना आदिवासी विकासमंत्रीपद (Tribal Development Minister) मिळण्याची दाट शक्यता आहे.

झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द

दिंडोरी तालुक्यातील वनारे या आदिवासी दुर्गम पाड्यावर राहणारे नरहरी झिरवाळ हे आदिवासी जनता, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गावच्या सरपंच पदापासून तर विधानसभेच्या उपाध्यक्ष व आता कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या झिरवाळ यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे.सातपूर येथील एमआयडीसीत एका ठेकेदाराकडे रोजंदारीवर काम करून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरु केले. इयत्ता बारावीनंतर वणी येथील होस्टेलला नंबर लागल्यानंतर वणी महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेऊन दिंडोरी तहसील कार्यालयात कनिष्ठ लिपिक कमशिपाई म्हणून नोकरी पत्करली. माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे भाचे असल्याने त्यांच्याशी परिचय व त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची प्रेरणा झिरवाळ यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच वनारे व परिसरातील गावांमधील लोक असंख्य समस्या घेऊन दिंडोरीला येत. रेशन कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, जमिनीच्या नोंदी, नकाशे, अशा नानाविध कागदपत्रांसाठी आपले लोक चकरा मारून मारून दमताना झिरवाळ यांनी पहिले. शक्य तेवढी मदत करून जास्तीत जास्त लोकांना सहकार्य करण्याचे काम या काळात त्यांनी केले.

याचवेळी वनारे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक लागली. खा.हरिभाऊ महाले व जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी झिरवाळ यांना ग्रामपंचायतीतील उमेदवारी करण्याची विनंती केली. त्यामुळे नोकरी सोडून त्यांनी ग्रामपंचायतीचे नेतृत्व स्वीकारले व सरपंच झाले.सरपंच झाल्यानंतर गावाचा विकास व ग्रामपंचायत निधीसाठी संघर्ष करावा लागतो हे त्यांच्या लक्षात आले. विविध आदिवासी व पाड्यांच्या ग्रामपंचायती एकत्र होत्या. दुर्गम व डोंगराळ भागात लोक संख्येमुळे १० ते १५ पाडे मिळून एक ग्रामपंचायत हा ग्रुप ग्रामपंचायत प्रकार म्हणजे आदिवासी जनतेवर अन्यायच हे लक्षात घेऊन झिरवाळ यांनी अनेक सरपंच, उपसरपंच सदस्य व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पंचायत समितीपासून जिल्हा परिषद. जिल्हाधिकारी व राज्यशासनापपर्यंत संघर्ष केला. अनेक ग्रामपंचायती स्वतंत्र केल्या तसेच या निमित्ताने आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, राज्यशासनाच्या अनेक लोक कल्याणकारी योजना यांचा सांगोपांग अभ्यास केला. खा.हरिभाऊ महाले यांचे कुशल नेतृत्व व अभ्यास यांची प्रेरणा घेऊन त्यांनी ननाशी गावात पंचायत समिती सदस्य ही निवडणूक लढवली व प्रथमच ते दिंडोरी पंचायत समितीचे सदस्य झाले.

श्रीराम शेटे यांनी हिरा शोधला

पंचायत समिती सदस्य आणि नंतर पंचायत समितीत उपसभापती पदावर झिरवाळ यांची वर्णी लागली. या काळात पंचायत समितीचे सभापती व ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्याशी झिरवाळ यांचा जवळून परिचय झाला. इतक्या संपन्न गुणवत्तेचा कार्यकर्ता आपल्याकडे असला पाहिजे, असे शेटे यांना वाटत होते. संधी मिळताच श्रीराम शेटे यांनी झिरवाळ यांना काँग्रेस पक्षात आणले व पुढील नेतृत्वाची दिशा पक्की केली.

श्रीराम शेटे यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती

आज नरहरी झिरवाळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली असता त्यावेळी श्रीराम शेटे देखील हजर होते. श्रीराम शेटे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असून ते शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर झिरवाळ यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. तर शेटे यांनी शरद पवार यांची साथ दिली होती.त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार निवडून आणण्यात शेटे यांचा मोलाचा वाट होता. मात्र, आज झालेल्या झिरवाळ यांच्या शपथविधी सोहळ्याला शेटे यांनी हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय प्रवास

१९८४ – सरपंच, वनारे गाव, तसेच वारे विविध कार्यकारी संस्थेचे संचालक ,चेअरमन
१९९५ – दिंडोरी विधानसभा पोटनिवडणुकीत जनता दलकडून विधानसभा निवडणूक, पराभूत
१९९७ – जनता दलाकडून पंचायत समिती सदस्य, उपसभापती.. कोशिंबे पंचायत समिती गण
१९९९ – पासून दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
२००२ – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य कोशिंबे गट
२००४ – आमदार, दिंडोरी विधानसभा
२००९ – दिंडोरी लोकसभा पराभव राष्ट्रवादी
२००९ – विधानसभा १४९ मतांनी निसटता पराभव, तर २०१४,२०१९ आणि २०२४ सलग राष्ट्रवादीचे आमदार

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...