Tuesday, September 1, 2026
Homeमहाराष्ट्रMahadevi-Madhuri Elephant : 'माधुरी' परत येण्याचा मार्ग मोकळा?; मुख्यमंत्र्यांनीच दिली मोठी अपडेट

Mahadevi-Madhuri Elephant : ‘माधुरी’ परत येण्याचा मार्ग मोकळा?; मुख्यमंत्र्यांनीच दिली मोठी अपडेट

मुंबई । Mumbai

- Advertisement -

महादेव हत्तीण ‘माधुरी’ला परत नांदणी मठात आणण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभं राहिलं आहे. कोल्हापुरात नागरिक रस्त्यावर उतरले, भव्य मोर्चा काढण्यात आला. विविध आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आंदोलनात सहभाग घेतल्याने राज्य सरकारवर दबाव निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर काल (५ ऑगस्ट) मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी माधुरी हत्तीण नांदणी मठात परत आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याची घोषणा केली. यासंदर्भात त्यांनी मठ प्रशासनासोबत समन्वय साधून पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनताराचे सीईओ यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे हत्तीण परत आणण्याच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. फडणवीस यांनी या चर्चेची माहिती सोशल मीडियावर ट्विटद्वारे दिली.

मुख्यमंत्र्यांनी काय केले ट्विट?

वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.

या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कालच्या बैठकीत काय निर्णय?

34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल, अशी मोठी भूमिका मुख्यमंत्र्यांनी कालच्या मंत्रालयातील बैठकीत मांडली. हत्तीणाची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल, आणि तसेच सुप्रीम कोर्टात ही भूमिका मांडेल. तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेसक्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत आहे. माधुरी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले .

ताज्या बातम्या

सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीला एक वर्षाची मुदतवाढ

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai पारंपरिक तेलघाणा व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक तसेच हातावर पोट असणारे व्यक्तींना दिलासा देत राज्य सरकारने मंगळवारी सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीला आणखी एक वर्षाची...