Tuesday, July 14, 2026
HomeराजकीयMumbai News : मुंबईत 'मराठी'वरून रणकंदन! शिंदेसेनेच्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक, गाडीच्या चाकाची...

Mumbai News : मुंबईत ‘मराठी’वरून रणकंदन! शिंदेसेनेच्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक, गाडीच्या चाकाची हवा काढली

मुंबई । Mumbai

मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा आणि रिक्षाचालकांसाठी ‘मराठी’ भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावरून राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या निर्णयाला शिवसेना आणि मनसेने पाठिंबा दिला असतानाच, माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला कडाडून विरोध दर्शवला आहे. याच विरोधातून आज दहिसरमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला, जिथे मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या ताफ्यावर हल्ला करत जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisement -

संजय निरुपम हे दहिसर परिसरातील रिक्षाचालकांशी संवाद साधण्यासाठी आणि मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आले होते. मात्र, याची कुणकुण लागताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गोळा झाले. “मुंबईत राहायचे असेल तर मराठी बोललीच पाहिजे,” अशा घोषणा देत मनसैनिकांनी निरुपम यांच्या उपस्थितीला आक्षेप घेतला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या कारच्या चाकांमधील हवा सोडली आणि त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या. काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.

या घटनेनंतर मनसे नेते नयन कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, “संजय निरुपम हे मराठी द्वेषी आहेत. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांना आम्ही खपवून घेणार नाही. आज आमच्या कार्यकर्त्यांनी जे केले, त्याचा आम्हाला अभिमान आहे.” दुसरीकडे, पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठी सक्तीच्या या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी थेट मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी “मराठी रिक्षाचालकांना कोणी अडवले तर मनसे स्टाईलने धडा शिकवू,” असा इशारा दिला होता. त्यावर टीका करताना सदावर्ते म्हणाले, “अमित ठाकरे हे काय हवालदार झाले आहेत का? की त्यांना आरटीओने मारहाणीचा बॅच दिला आहे? राज ठाकरेंची औलाद अशी भाषा कशी काय बोलू शकते?” सदावर्ते यांच्या या विधानामुळे मनसे विरुद्ध सदावर्ते असा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत रिक्षाचालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे उत्तर भारतीय मतपेढी आणि मराठी अस्मिता असे दोन गट समोरासमोर आले आहेत. एकीकडे सत्ताधारी शिवसेना आणि मनसे मराठीचा अजेंडा पुढे रेटत असताना, दुसरीकडे संजय निरुपम आणि गुणरत्न सदावर्ते यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : ​ सावळघाटात भीषण अपघात; चार जण ठार, एक...

0
पेठ | प्रतिनिधी Peth नाशिक-पेठ रस्त्यावरील सावळघाटात आज सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. पेठ-दिंडोरी हद्दीलगत एका भरधाव ट्रकचे ब्रेक फेल...