मुंबई । Mumbai
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद आता राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले आहेत. या निवडणुकीदरम्यान पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी आपल्याला खेचत नेल्याने हाताला दुखापत झाल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिली. या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे उपनेते अनिल परब यांनी या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांना ‘लाथ मारून सत्तेबाहेर पडा’ असे आव्हान देत डिवचण्याचा प्रयत्न केला.
सातारा जिल्हा परिषदेत २० मार्च रोजी झालेल्या गोंधळाचा संदर्भ देत अनिल परब यांनी विधान परिषदेत आक्रमक पवित्रा घेतला. आज ‘शहीद दिन’ असल्याचे आठवण करून देत परब म्हणाले की, “ज्या राज्यात सत्ताधारी मंत्री आणि कार्यकर्त्यांना पोलीस मारहाण करतात, तिथे सामान्य जनतेला काय संरक्षण मिळणार? स्वाभिमानासाठी उठाव केला, असे सांगणारे आज सत्तेत असूनही पोलिसांचा मार खात आहेत. भाजपसमोर शिंदे गटाचे मंत्री आपली ‘बंडखोर वृत्ती’ विसरले असून त्यांनी शेपटी घातली आहे,” अशी जळजळीत टीका परब यांनी केली. राष्ट्रवादीसोबत असताना निधी मिळत नाही म्हणून बाहेर पडलात, मग आता भाजपच्या काळात पोलिसांचा मार खाऊन गप्प का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अनिल परब यांनी पुढे उपरोधिकपणे म्हटले की, “स्वतःला वाघ समजणारे आता कुठे गेले? जर तुमच्यात हिंमत असेल तर आजच सत्तेचा त्याग करून बाहेर पडा, तरच लोक तुम्हाला आदराने बघतील.” त्यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे या विषयावर सविस्तर चर्चेची मागणी केली. तसेच, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संबंधित आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिले असले तरी, प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत परब यांनी अविश्वासाचा ठराव आणण्याची परवानगी मागितली.
परब यांच्या या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. सामंत म्हणाले की, “उठाव करून जेव्हा आम्ही मुंबईत आलो, तेव्हा आमचे ‘कोतळे’ काढण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. वरळीत पाऊल ठेवू देणार नाही असे म्हटले गेले, पण आम्ही कोणालाही घाबरलो नाही. त्यामुळे आम्हाला ‘शेपटी’ घालण्याच्या गोष्टी शिकवू नका. मंत्री असले तरी शंभूराज देसाई आधी आमदार आहेत आणि त्यांनी सभागृहात न्याय मागणे हा संसदीय संस्काराचा भाग आहे. ज्यांना संस्कार माहिती नाहीत, तेच अशी भाषा वापरतात.”
मंत्री शंभूराज देसाई यांनीही अनिल परब यांना इशारा दिला. “आम्ही हतबल आहोत असे समजण्याचे अजिबात कारण नाही. हिंदुत्वासाठी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती टिकवण्यासाठी आम्ही भूमिका घेतली आहे. कालच्या घटनेसारखे काही कटू अनुभव आले तरी ते योग्य व्यासपीठावर दुरुस्त केले जातील. आम्ही हातबल होऊन दाद मागितलेली नाही, तर वस्तुस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे विनाकारण आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका,” असे देसाई यांनी ठणकावून सांगितले. या वादामुळे सभागृहातील वातावरण काही काळ कमालीचे तापले होते.





