Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : "कुंभमेळा मंत्री, महापालिका आयुक्तांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा";...

Sanjay Raut : “कुंभमेळा मंत्री, महापालिका आयुक्तांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा”; संजय राऊतांची जनआक्रोश मोर्चातून मागणी

नाशिक | Nashik

शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि महापालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज (सोमवारी) नाशिक महापालिकेवर (Nashik NMC) भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून महापालिका मुख्यालयावर धडकलेल्या या मोर्चेचे नेतृत्व खासदार संजय राऊत आणि खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी केले. मोर्चानंतर उपस्थितांना संबोधित करताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कुंभमेळा मंत्री, महापालिका आयुक्त आणि कंत्राटदारांवर अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले.

- Advertisement -

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, “नाशिकमधील खड्ड्यांमुळे सात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. ही साधी दुर्घटना नसून थेट हत्या आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त, कुंभमेळा मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. मृतांच्या नातेवाइकांना १ कोटी रुपये, तर जखमींना ५० लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

कंत्राट अन् कमिशनचा खेळ

राऊत पुढे म्हणाले की, “कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या निधीत मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. गुजरात आणि जळगावच्या ठेकेदारांना कंत्राटे देऊन कोट्यवधींचे कमिशन खाल्ले जात आहे. जावयाच्या कंपनीला एकाच दिवसात २७ कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याची कागदपत्रे माझ्याकडे आली आहेत. डुप्लिकेट वर्क ऑर्डर काढून नाशिककरांची लूट सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

महापालिका प्रशासनाला थेट इशारा

तसेच “आयुक्तांमध्ये थोडी जरी संवेदनशीलता शिल्लक असेल, तर त्यांनी खाली येऊन आमचे निवेदन स्वीकारावे आणि खड्डे बुजवण्यासाठी निश्चित कालमर्यादा द्यावी. हवेतील शब्द चालणार नाहीत. जर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर महापालिकेचे गेट तोडून आत घुसण्यास शिवसैनिक मागेपुढे पाहणार नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.

अयोध्येपाठोपाठ नाशिकलाही भ्रष्टाचाराचा विळखा

तर भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले, “ज्यांनी अयोध्येतील रामाला सोडले नाही, ते पंचवटीच्या रामाला काय सोडणार? नाशिकला दत्तक घेणाऱ्या ‘दत्तक पित्यांनी’ आता रस्त्यांवरील डांबरासाठी इराणच्या युद्धाचे कारण सांगू नये. हे आंदोलन केवळ एक इशारा आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर तीव्र आंदोलने छेडली जातील, असा इशारा त्यांनी दिला.

महापालिका आयुक्तांना निवेदन

मोर्च्याच्या समाप्तीनंतर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला निवेदन सादर केले. शहरातील खड्डे त्वरित बुजवावेत, रस्ते दुरुस्तीची गुणवत्ता सुधारावी आणि निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

बिहारमधील लखीसराय मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू, 12 भाविक जखमी

0
दिल्ली। Delhi पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध 'अशोक धाम' मंदिरात एक अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. मंदिरात शिवाभूमीत जलाभिषेक...