मुंबई । Mumbai
अध्यात्म आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ याला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेनंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सत्ताधारी नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणाचे वर्णन ‘महाराष्ट्राची एपस्टीन फाईल’ असे करत थेट सरकारला धारेवर धरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्यावर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली. तपासादरम्यान पोलिसांनी खरात याच्याकडून काही पेनड्राइव्ह हस्तगत केले असून, त्यामध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओंच्या माध्यमातून अनेक महिलांचे शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक खुलाशामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणावर आक्रमक पवित्रा घेत सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे अनेक धक्कादायक दावे केले आहेत. खरात याच्याकडे अनेक बड्या राजकीय नेत्यांचा राबता होता, असा आरोप करत त्यांनी दीपक केसरकर, सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांसारख्या नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. खरात याच्या सांगण्यावरून काही नेत्यांनी अघोरी पूजा करणे, अगदी स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेण्यासारखे प्रकार केल्याची चर्चाही जनमानसात असल्याचे अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अंधारे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधताना म्हटले की, यापूर्वी जेव्हा एका संस्थेने खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून संबंधित संस्थेवर दबाव आणला आणि खरातसाठी माफीनामा लिहून घेतला होता. विशेष म्हणजे, खरात याने स्थापन केलेल्या एका संस्थेवर चाकणकर या संचालक म्हणून कार्यरत आहेत. खरातच्या घरातील कौटुंबिक कार्यक्रमात चाकणकर यांची सक्रिय उपस्थिती अनेकांनी पाहिली आहे, असा दावाही त्यांनी केला.
या गंभीर प्रकरणाचे पडसाद उमटत असताना अंधारे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही साद घातली आहे. “सुनेत्रा वहिनी, एक महिला म्हणून तुम्हाला हे पटते का? अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणाऱ्या व्यक्तीला जबाबदार पदावर ठेवणे योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महिला आयोगासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदाचा वापर करून जर अशा गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा टोकदार प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
अशोक खरात याच्या अटकेमुळे आता अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ५८ व्हिडिओमध्ये नेमके काय आहे आणि यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या प्रकरणाला आता केवळ गुन्हेगारी स्वरूप उरले नसून, त्याला प्राप्त झालेल्या राजकीय वळणामुळे येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.





