मुंबई । Mumbai
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या जागतिक तणावाचे पडसाद आता थेट भारतीय बाजारपेठेवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संघर्षामुळे अनेक देशांसमोर इंधन टंचाईचे संकट उभे राहिले असतानाच, भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.
देशात गेल्या अवघ्या १२ दिवसांत तब्बल चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. या सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, राज्यात इंधन तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शांततेचे आणि साठेबाजी न करण्याचे आग्रही आवाहन केले आहे.
इंधन टंचाईच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जागतिक स्तरावरील संकटामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, यामुळे राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल-डिझेलची विनाकारण साठेबाजी करू नये.” मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना कडक इशारा दिला की, परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी इंधनाची अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर प्रशासनातर्फे अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सध्या शेतीचा हंगाम लक्षात घेता, डिझेलचा तुटवडा भासू नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या आहेत. “अनेक शेतकरी बांधवांना शेतीकामांसाठी डिझेलची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात इंधन वितरणाचे चोख नियोजन करावे. शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना त्यांच्या गरजेनुसार इंधन सहज उपलब्ध होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे,” असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
काही ठिकाणी इंधन पंपांवर गर्दीमुळे किरकोळ तणाव निर्माण झाल्याच्या वृत्तावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. “काही मोजक्या ठिकाणी किरकोळ तणावाची स्थिती निर्माण झाली असली, तरी ही परिस्थिती सर्वदूर नाही. एखाद्या ठिकाणची घटना सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर जास्त हायलाईट होत आहे. नागरिकांनी पॅनिक (घाबरून) न होता सहकार्य करावे, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आणि प्रशासन कटिबद्ध आहे,” असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे उद्भवलेल्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे आवश्यक असल्याचे चित्र आहे.




