Sunday, September 27, 2026
HomeनगरMaharashtra fuel shortage : अचानक वाढली इंधनाची मागणी! CM फडणवीस म्हणाले, “काहीतरी...

Maharashtra fuel shortage : अचानक वाढली इंधनाची मागणी! CM फडणवीस म्हणाले, “काहीतरी गडबड…”

शिर्डी । प्रतिनिधी

एकीकडे कडक उन्हाळा आणि दुसरीकडे लागवडीच्या तोंडावर राज्यात इंधन तुटवड्याचे संकट उभे ठाकले आहे. ग्रामीण भागात डिझेल मिळणे कठीण झाल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच, आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. “राज्यात अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत २० ते ३० टक्क्यांनी मोठी वाढ झाली असून, शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी इंधनाची अवैध साठेबाजी करत असेल, तर गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -

शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी डिझेल तुटवड्याचा सामना करावा लागत असल्याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला तत्परतेने काम करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामीण भागातील इंधन पुरवठ्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी माझे सविस्तर बोलणे झाले आहे. बळीराजाला खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी डिझेल कमी पडू नये, ही सरकारची प्राथमिकता आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत अचानक मागणीत झालेली २० ते ३० टक्के वाढ ही संशयास्पद आहे. यामध्ये काहीतरी गडबड असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.”

शेतकऱ्यांना त्रास न देता केवळ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत इंधन पोहोचावे, यासाठी प्रशासनाने आता ‘स्मार्ट’ मार्ग निवडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर किंवा कृषी पंपांचे ‘आरसी बुक’ (RC Book) तपासून डिझेल देण्यास सुरुवात केली आहे. हाच पॅटर्न राज्यभर राबवण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दुसरीकडे, इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी पुरते होरपळून निघाले आहेत. आज, शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या दहा दिवसांतील ही तिसरी मोठी दरवाढ ठरली आहे. ऐन पेरणीच्या हंगामात एका बाजूला वाढणारे दर आणि दुसऱ्या बाजूला पुरवठ्यातील अनिश्चितता यामुळे बळीराजा चिंतेत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकारी साठेबाजांवर काय कारवाई करतात आणि ग्रामीण भागातील इंधन पुरवठा कधी सुरळीत होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...