Wednesday, April 29, 2026
HomeराजकीयDevendra Fadnavis : राज्यात इंधन तुटवडा नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई;...

Devendra Fadnavis : राज्यात इंधन तुटवडा नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबई । Mumbai

गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून राज्यात एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. इंधन टंचाई किंवा लॉकडाऊनबाबतच्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकार कडक पावले उचलणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त करताना सांगितले की, केंद्र सरकारच्या प्रभावी राजनैतिक संबंधांमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशात इंधनाची कोणतीही कमतरता भासणार नाही. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढल्या असल्या, तरी त्याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसू नये, यासाठी सरकार सर्वतोपरी काळजी घेत आहे. इंधन साठ्याबाबत कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून लॉकडाऊन लागण्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. अशा अफवा पसरवून समाजात गोंधळ निर्माण करणे हे देशविरोधी कृत्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अशा प्रवृत्तींवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जनतेने कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही सरकारने केले आहे.

भविष्यातील इंधन समस्या टाळण्यासाठी सरकार आता एलपीजी ऐवजी पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) वापरण्यावर भर देत आहे. शहरांमध्ये महानगर गॅसच्या माध्यमातून पीएनजी पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एलपीजीवरील अवलंबित्व कमी करून घराघरात थेट गॅस जोडणी देण्याबाबत सरकारने विशेष आदेश काढले आहेत. यामुळे भविष्यात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई जाणवणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात एक महत्त्वाचे विधान केले आहे. केंद्राकडून मिळालेल्या पत्राचा हवाला देत भुजबळ म्हणाले की, येत्या तीन महिन्यांत एलपीजी गॅसचा पुरवठा मर्यादित करून पीएनजी जोडणीवर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे. वाढत्या मागणीमुळे आणि संभाव्य संकटामुळे एलपीजीऐवजी पीएनजी हे अधिक प्रभावी माध्यम ठरेल. यामुळे काही तांत्रिक बदलांमुळे एलपीजी सिलिंडरचा वापर भविष्यात कमी किंवा बंद होऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

आखाती युद्धामुळे अनेक ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, शासनाने स्पष्ट केले आहे की, हा केवळ तांत्रिक बदलाचा आणि नियोजनाचा भाग असून पुरवठ्यात कोणतीही प्रत्यक्ष घट झालेली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा आणि इंधनाचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या