नवी दिल्ली | New Delhi
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे दोन दिवसांच्या त्यांच्या रायबरेली मतदारसंघाच्या (Rae Bareli Constituency) दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते मतदारसंघातील लोकांशी संवाद साधत आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघांत प्रचार सभा घेऊन भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. अशातच आज (बुधवारी) त्यांनी रायबरेलीच्या लोधवारी गावात बहुजन स्वाभिमान सभेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना गद्दार म्हणत हल्लाबोल केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, “जेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते (RSS Worker) तुमच्यासमोर येतील, तेव्हा त्यांना उघडपणे सांगा की तुमचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि संघटना गद्दार आहेत. त्यांनी भारताला विकलं आहे. दोष पूर्णपणे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएसचा आहे कारण त्यांनी राज्यघटना नष्ट केली आहे. आता आर्थिक वादळ येत असून, यातून मोदी तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. जसे ते करोना आणि नोटाबंदीच्या वेळी ‘मला फाशी द्या’ असे म्हणत रडले होते, तसेच ते पुन्हा टीव्हीवर येतील आणि हात जोडून रडत म्हणतील ही माझी चूक नाही”, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
पंतप्रधान चॉकलेट वाटण्यात मश्गुल – राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इटलीच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मंगळवारी रात्री इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यानंतर या दोघांनी रोम शहरात एक खास फोटोसेशन केले. मोदी-मेलोनींचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेलोनी यांच्यासोबत कोलॅब करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी हे इटलीच्या पंतप्रधानांना त्यांच्या नावाशी सार्धम्य असलेली मेलेडी चॉकलेटस् देताना दिसत आहेत. याच व्हिडीओवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. “देशाच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावत असताना आपले पंतप्रधान इटलीत चॉकलेटस वाटण्याच मश्गुल आहेत. देशातील शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि लहान शेतकरी दु:खात आहेत. दोन महिन्यांपासून देशात बेरोजगारी वाढतेय हे मी सांगतोय, पण माझी खिल्ली उडवली जात आहे. पंतप्रधान मोदी हसत आहेत, रिल्स बनवत आहेत आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवत आहेत. याला नेतृत्व म्हणत नाहीत, ही नौटंकी आहे, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.
मतदारसंघातील सातवी भेट
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) रायबरेली आणि केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, त्यांनी वायनाड मतदारसंघातून राजीनामा देत रायबरेली मतदारसंघ कायम ठेवला होता. त्यानंतर वायनाड मतदारसंघातून त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी निवडून आल्या. रायबरेली मतदारसंघाचे खासदार झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आतापर्यंत मतदारसंघाला सहा वेळा भेट दिली आहे. यानंतर त्यांची ही सातवी भेट आहे. यापूर्वी त्यांनी १९ जानेवारी २०२६ रोजी रायबरेलीला भेट दिली होती.




