मुंबई | Mumbai
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) अतोनात नुकसान झाले असून, विरोधकांकडून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडून ३१.६४ लाख शेतकऱ्यांना (Farmer) खरीपासाठी २ हजार २१५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खरीप २०२५ मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार, मदत जाहीर कऱण्यात आली आहे. हिंगोली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नाशिकचा समावेश आहे.
दरम्यान, जुलै महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ७२१ कोटी, नाशिकमध्ये १३.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये पुणे विभागासाठी १४.२९, नागपूर विभागाला २३. ८५ कोटी आणि अमरावती विभागाला ५६५.६० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर कोकणाला १०.५३ कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही सगळी मिळून राज्य सरकारने खरीप हंगामासाठी आतापर्यंत २२०० कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री मकरंद पाटील (Makrand Patil) यांनी सांगितले होते.
७० लाख एकरवरील पिकांचे नुकसान
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे राज्यभरात जवळपास ७० लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिली आहे. तसेच या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करण्याचे देण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे या परिस्थितीवर नजर ठेऊन असल्याचेही भरणे यांनी म्हटले.





