Monday, September 28, 2026
HomeनगरAhilyanagar : पाच कोटींच्या महसुलासाठी 100 कोटींचे रस्ते खराब करणार का?

Ahilyanagar : पाच कोटींच्या महसुलासाठी 100 कोटींचे रस्ते खराब करणार का?

वाळूच्या ओव्हरलोड वाहतुकीवर अंदाज समितीचा संताप || परिवहन खात्याबाबत व्यक्त केली नाराजी || नगर महापालिकेच्या कामाची चार तास झाडाझडती || एमआयडीसीमधील शासकीय डेअरीच्या जागेबाबत विचारणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीच्या बैठकीत गुरूवारी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान काही विभागाची जोरदार झाडाझडती घेण्यात आली. यावेळी सर्वाधिक चर्चा ही नगर मनपाच्या योजना आणि विकास कामावर झाली. सुमारे चार तास झालेल्या चर्चेनंतर नगर विकास विभागाच्या सचिवांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, नगर जिल्ह्यात गौण खनिज विभाग ओव्हरलोड वाळू वाहतुकीतून पाच कोटींच्या महसुलासाठी शंभर कोटींचे रस्ते खराब करणार का? असा सवाल अंदाज समितीने उपस्थित केला. बैठकीत परिवहन विभाग यासह नगर एमआयडीसीमधील शासकीय डेअरीच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी विचारणा केली.

- Advertisement -

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आ. अर्जून खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती जिल्ह्यात तीन दिवसाच्या दौर्‍यावर आहे. समितीने गुरूवारी दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत विभागनिहाय आढावा घेण्यात आला. या समितीचे 27 सदस्य असले तरी या बैठकीला निवडक आमदार सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंनद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी समितीच्या सदस्यांचे स्वागत केले.

दुपारी साडे बारा वाजता समितीच्या बैठकीला सुरूवात झाली. पहिला विषय कृषी विभागाचा झाला. त्यानंतर विविध विभागाचा आढावा घेतल्यानंतर अहिल्यानगर महापालिकाच्या कामावर समितीच्या सदस्यांनी बोट ठेवले. यात नगर शहरातील ओढे – नाल्यांवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे, फेज -2, अमृत व युआयडीएसएसएमटी या योजनेत झालेल्या कामांची माहिती समितीने मागविली आहे. त्याबरोबर सारडा महाविद्यालयाजवळील नाल्याची देखील माहिती समितीने मागविली आहे. यावेळी वाळू उपशावर समितीने प्रश्नचिन्ह उभे करून वाळूची वाहतूक हायवाने न करता लहान वाहनांनी करण्याची सुचना प्रशासनाला करण्यात आली आहे. तसेच शंभर कोटींचे रस्ते खराब होणार नाही, अशा पद्धतीने वाळू वाहतूक करण्यात यावी, असे समितीने स्पष्ट केल्याचे समजते.

अहिल्यानगर महापालिकेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी महापालिकेने विकास कामांबाबत दिलेली आकडेवारी चुकल्याची असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी महापालिका अधिकार्‍यांना तातडीने आकडेवारी दुरुस्त करू आणण्याचे आदेश दिले. त्याबरोबर शहरातील ओढे नाल्यांवर झालेल्या अनधिकृत बांधकामे, सारडा महाविद्यालयाजवळील नाल्यांवरील बांधकाम, फेज 2, अमृत यासह युआयडीएसएसएमटी या योजनेत झालेल्या कामांची माहिती समितीने मागविली आहे. ही माहिती महापालिकेकडून देण्यास विलंब झाल्याचे समजते. यावेळी बैठकीत वाळू उपश्याचा विषय चर्चेत राहिला. वाळूतून अवघा पाच कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यासाठी शंभर कोटी रुपयांचे रस्ते खराब करायचे का? असा थेट सवाल समितीने उपस्थित केला. सर्वसामान्यांना वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, तसेच मोठ्या हायवाऐवजी लहान वाहनांतून वाहतूक केल्यास रस्त्यांचे नुकसान टाळता येईल, असे मत समितीने व्यक्त केले.

टंचाईसह उपाययोजनांची माहिती घेतली
सुरुवातील समितीच्या बैठकीत कृषी विभागाचा आढावा झाला. पाऊस, पेरणी, यासह टंचाईवर चर्चा झाली. यावेळी वॉटर बँकबाबत चर्चा झाली. शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असून त्यासाठी लागणार निधी देखील समितीच्या शिफारशीनुसार उपलब्ध करू देण्याची ग्वाही यावेळी समितीने दिली. नगर जिल्ह्यात झालेले कमी पर्जन्यमान यामुळे टंचाई निर्माण झाल्यास करण्यात येणार्‍या उपाययोजनाबाबत समितीचे माहिती घेतली. यावेळी जिल्ह्यात सुरू असणार्‍या पाण्याच्या टँकरबाबत समितीला अवगत करण्यात आले.

बैठकीची माहिती बाहेर दिल्यास हक्कभंग
बैठकीच्या सुरवातीलाच समितीचे अध्यक्ष आ. खोतकर यांनी या बैठकीची माहिती कोणत्याही अधिकार्‍यांनी बाहेर देऊ नये. बाहेर माहिती दिल्यास संबंधितांवर हक्कभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. आढावा बैठकीत अनेक त्रुटी व काही कामांतील अनियमितता निदर्शनास आल्याचे समितीने नमूद केले. विविध योजनांच्या अंमलबजावणीत आवश्यक बदल करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

पैशांची चर्चा होत असते…
विधीमंडळ अंदाज समितीच्या दौर्‍यावर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. दौर्‍याच्या खर्च आणि समितीने कोणीही त्रुटी काढून नये यासाठी रेडकार्ड काढण्यात आल्याची चर्चा होती. आता हे रेडकार्ड एका विभागासाठी की एकत्रित हा चर्चेचा विषय होता. याबाबत समितीचे अध्यक्ष आ. खोतकर यांनी स्पष्ट शब्दात याबाबत चर्चात होत असतात. मात्र तसे काही झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरविकास सचिवांची नोंदवणार साक्ष
समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांची शहरातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सकाळी भेट घेतली. संभाजी कदम, विक्रम राठोड, संदेश कार्ले, रामदास भोर यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले होते. महाराष्ट्र विधानभवन अंदाज समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांना अहिल्यानगर प्रशासनाच्या तर्फे अहिल्यादेवी होळकर यांची मृर्ती भेट म्हणून देण्यात आली आहे. या वेळी मनपाच्या कामाची यादीच खोतकर यांना देण्यात आली. त्यानूसार त्यांनी बैठकीत मनपाची झाडाझडती घेतली असून नगर विकास विभागाच्या सचिवांची साक्ष नोंदवणार असल्याचे बैठकीनंतर सुत्रांनी सांगितले.

नगरच्या दूध उत्पादनाचे कौतूक
दुध उत्पादनात नगर जिल्हा आघाडीवर आहे. त्याबाबत देखील समितीने माहिती घेतली. जिल्ह्यात दररोज सुमारे 47 लाख लिटर दूध संकलन होत असल्याचा उल्लेख करत समितीने या कामगिरीचे कौतूक केले. इतर जिल्ह्यांनीही किमान चार ते पाच लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठावे, यासाठी राज्य शासनाकडे समितीच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “कारवाईचे श्रेय घेताय तर स्वतःचा विभागही…”; संजय राऊतांचे...

0
मुंबई | Mumbai अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या धडक कारवायांचे सुरुवातीला कौतुक केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत...