Wednesday, June 3, 2026
Homeमहाराष्ट्रमतदानाआधीच यवतमाळमध्ये नाट्यमय घडामोडी; 'मविआ'ला मोठा धक्का, साहेबराव कांबळेंची माघार!

मतदानाआधीच यवतमाळमध्ये नाट्यमय घडामोडी; ‘मविआ’ला मोठा धक्का, साहेबराव कांबळेंची माघार!

यवतमाळ । Yavatmal

महाराष्ट्रात सध्या विधान परिषद निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (मविआ) अशी थेट लढत १७ जागांवर रंगणार असतानाच, निवडणुकीच्या सुरुवातीलाच ‘मविआ’ला अत्यंत मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला आहे. यवतमाळमधील मविआचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी नाट्यमयरीत्या आपली उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने साहेबराव कांबळे यांना अधिकृत उमेदवारी बहाल केली होती. त्यांची थेट लढत शिंदेसेनेचे उमेदवार दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांच्याशी होणार होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच (४ जूनच्या एक दिवस आधी) कांबळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपला अर्ज मागे घेतला. ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात अचानक ‘सन्नाटा’ पसरला असून कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. सोलापूरमध्येही मविआच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याची ताजी जखम असतानाच, यवतमाळमधील या माघारीमुळे मविआचे गणित संपूर्णपणे कोलमडले आहे.

उम्मीदवारी मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना साहेबराव कांबळे यांनी सांगितले की, “निवडणुकी जिंकण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जुळत नसल्याने मी हा निर्णय घेतला आहे.” यासोबतच त्यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या संधीबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभारही मानले. परंतु, राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. ऐन मोक्याच्या क्षणी कांबळे यांनी नेमक्या कोणाच्या दबावाखाली येऊन मैदान सोडले, याबाबत अबालवृद्धांमध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. कांबळेंच्या या माघारीमुळे महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय सुकर झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असले, तरी निवडणुकीतील ‘ट्विस्ट’ अजून संपलेला नाही.

या मतदारसंघात सध्या महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी रिंगणात असले, तरी भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी पक्षादेश झुगारून अपक्ष बंडखोरी केली आहे. भुतडा सध्या मुंबईत तळ ठोकून असून, त्यांनी कालच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जर नितीन भुतडा यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पडद्यामागून छुपी साथ दिली, तर मात्र शिंदेसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्यासमोरील अडचणी कमालीच्या वाढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अस्तित्वात नसल्यामुळे केवळ ४४६ नगरसेवक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महायुती (एकूण २६१ मते): भाजप (१२५), शिंदेसेना (१०७), राष्ट्रवादी अजित पवार गट (२९).

महाविकास आघाडी (एकूण १२५ मते): काँग्रेस (९९), शिवसेना ठाकरे गट (२३), राष्ट्रवादी शरद पवार गट (०३).

निर्णायक मते: जनशक्ती (२०), अपक्ष (२०), एमआयएम (०७), वंचित बहुजन आघाडी (०५).

आकडेवारी पाहता महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले, तरी काँग्रेसच्या ९९ नगरसेवकांसह मविआची एकूण १२५ मते आता कोणाच्या पारड्यात जाणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मविआ आता थेट निवडणूक लढवण्याऐवजी भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांना पाठिंबा देऊन महायुतीमध्ये फूट पाडणार की नवा राजकीय डाव टाकणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : राहुरी कृषी विद्यापीठातील कंत्राटी मजुराची निर्घृण हत्या

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri महात्मा फुले कृषी विद्यापीठात (Mahatma Phule Agricultural University) कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण...