Saturday, June 6, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra monsoon 2026 : आनंदवार्ता! अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र...

Maharashtra monsoon 2026 : आनंदवार्ता! अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र व्यापणार

मुंबई । Mumbai

उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या महाराष्ट्राला अखेर दिलासा मिळाला आहे. राज्यातील लाखो शेतकरी आणि नागरिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला असून नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली असून आगामी काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

- Advertisement -

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मान्सून केरळमध्ये नेहमीपेक्षा तीन दिवस उशिरा, म्हणजे 4 जून रोजी दाखल झाला होता. मात्र त्यानंतर मान्सूनच्या प्रगतीला वेग आला असून कर्नाटक आणि तामिळनाडूमधून पुढे सरकत तो आता कोकण आणि गोव्यात पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्येही लवकरच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल पाहायला मिळाला. तीव्र उष्णतेनंतर अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी काही ठिकाणी शेतमालाचे नुकसान झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. आता मात्र अधिकृत मान्सून सुरू झाल्याने खरीप हंगामाच्या तयारीला वेग येणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच केरळपासून गोवा आणि मुंबईपर्यंतच्या पश्चिम किनारपट्टी भागातही पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, 6 जून रोजी महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील मिळून सुमारे 25 जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मान्सूनच्या आगमनामुळे पेरणीच्या कामांना गती मिळणार असून जलसाठ्यातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक दिलासादायक घडामोड मानली जात आहे.

ताज्या बातम्या

उद्धव

Uddhav Thackeray: ‘कॉकरोच’ म्हणून हिणवणे योग्य नाही’…; जंतरमंतरवरील आंदोलनावर उद्धव ठाकरेंचा...

0
मुंबई | Mumbaiदेशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार...