Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Monsoon Update : दिलासादायक! रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय; 'या' तारखेपासून मुंबईसह...

Maharashtra Monsoon Update : दिलासादायक! रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ तारखेपासून मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | Mumbai

जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरीही संपूर्ण महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता कडक ऊन आणि असह्य उकाड्याने त्रस्त आहे. मात्र, आता राज्यातील जनतेसाठी एक अत्यंत दिलासादायक वृत्त आहे. रेंगाळलेल्या मान्सूनचा (Monsoon) २३ जूनच्या सुमारास वेग वाढणार असून, तो महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांमध्ये वेगाने पुढे कूच करणार आहे.

- Advertisement -

हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, २२ ते २३ जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या लगतच्या प्रदेशात मान्सून पुन्हा एकदा जोर धरेल. सुरुवातीला पावसाची तीव्रता हळूहळू वाढेल आणि त्यानंतर २४ ते २६ जून या कालावधीत मान्सून मुंबईसह उत्तर कोकण तसेच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात रीतसर दाखल होईल. तर २५ जून ते १ जुलै दरम्यान मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

विशेषत २३ आणि २४ जून रोजी कोकण आणि गोव्यामध्ये पावसाचा जोर प्रचंड असणार आहे. तसेच जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत (Mumbai) मान्सून दाखल झाल्यानंतर खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि पश्चिम मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हजेरी लावेल. तर पूर्व मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना मुख्य मान्सूनसाठी जुलैच्या सुरुवातीपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, त्यापूर्वी या भागात काही ठिकाणी पूर्वमोसमी (वळीव) पावसाच्या सरी कोसळू शकतात. सध्याच्या घडीला मान्सूनची उत्तर सीमा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, भद्राचलम, कोरापुट, फुलबनी, रांची, जमुई आणि मुजफ्फरपूर या भागांतून जात आहे.

विदर्भात मात्र उष्णतेचा कहर कायम; ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

एकीकडे मान्सून सक्रिय होत असताना, दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने २० ते २३ जून या कालावधीत विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांवरही उष्णतेचा मोठा प्रभाव दिसून येत आहे.

हवामान विभागाचा महत्त्वाचा सल्ला

२२ आणि २३ जूनला बुलढाणा जिल्ह्यालाही अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Sangamner : जिल्हा बँकेच्या रणधुमाळीचे केंद्र बनले ‘संगमनेर’

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना, या निवडणुकीच्या हालचालींचे केंद्रस्थान संगमनेर ठरत असल्याचे चित्र आहे. दोन...