मुंबई । Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून डोळ्यात तेल घालून पावसाची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेची प्रतीक्षा अखेर संपली आहे. हवा तसा पाऊस कोसळत नसल्याने निर्माण झालेली चिंता आता दूर होताना दिसत आहे. २ जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून तब्बल १५ दिवस अरबी समुद्रातच रेंगाळला होता. मात्र, आता त्याने आपली सुस्ती झटकली असून, संपूर्ण महाराष्ट्र व्यापून मान्सूनने आता गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगडच्या दिशेने कूच केली आहे. पुढील दोन दिवसांत तो या राज्यांमध्ये पूर्णपणे सक्रिय होईल.
राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झाला नव्हता. मात्र, पुढील २४ ते ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. राजधानी मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, विदर्भातील अमरावती जिल्ह्याला हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून, येथे विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर पावसाने जोरदार हजेरी लावली असून नवी मुंबईत गेल्या काही तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. वाशी, जुईनगर आणि पनवेल परिसराला पावसाने झोडपून काढले. अवघ्या पाऊण तासाच्या पावसामुळे प्रसिद्ध एपीएमसी (APMC) मार्केट परिसर आणि इतर सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला.
कल्याण-डोंबिवली परिसरात रात्री ९.३० च्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या नालासफाईच्या दाव्यांची हवा काढली. कल्याण पश्चिमेकडील सदानंद चौक ते अहिल्याबाई चौक परिसर पूर्णपणे जलमय झाला होता. पहिल्याच मोठ्या पावसात रस्ते पाण्याखाली गेल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुष्काळाच्या छायेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातून एक आनंदाची बातमी आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे सोलापूरकर चिंतेत होते. दिवसभर कडक ऊन पडल्यानंतर, सायंकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने एन्ट्री घेतली. या पावसामुळे उन्हाळ्याच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ५ दिवस राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




