मुंबई | Mumbai
२००६ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) निर्दोष सुटका केली आहे. यापैकी एकाचा या कालावधीत मृत्यू (Death) झाला आहे. तर ११ जणांची मुक्तता होणार आहे. माटुंगा रोड, माहीम जंक्शन, वांद्रे, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदर या ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले होते. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने आज (दि. २१ जुलै) रोजी हा महत्त्वाचा निकाल दिला आहे.
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात २०९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८०० हून अधिकजण जखमी झाले होते.लोकल ट्रेन्समध्ये ११ मिनिटांत सात ठिकाणी चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. मात्र, पोलीस आणि तपास यंत्रणांना याप्रकरणात न्यायालयात योग्यप्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे ११ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दोषींना अमरावती, नागपूर आणि पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून (Jail) व्हीसीद्वारे हजर करण्यात आले होते.
दरम्यान, १९ वर्षांपूर्वी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सात ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील पाच दोषींच्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आणि सात दोषींच्या जन्मठेपेच्या (Life Imprisonment) शिक्षेच्या विरोधातील अपिलांवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा आणि उर्वरित सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल फिरवत ११ आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. या निकालामुळे मुंबई पोलिसांच्या तपासाला झटका बसला आहे. तसेच न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
नेमकं प्रकरण काय आहे?
मुंबईत ११ जुलै २००६ साली ट्रेनमध्ये ७ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये २०९ जण मृत्युमुखी पडले होते, तर ८०० हून अधिक जण जखमी झाले होते. संध्याकाळी ६.२४ ते ६.४२ वाजताच्या दरम्यान हे बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये गर्दी होती. गर्दीच्या वेळेत पश्चिम रेल्वेवरील वेगवेगळ्या लोकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचे एकामागोमाग स्फोट झाले होते. त्यामुळे २०९ जणांचा मृत्यू झाला होता. तर कित्येक जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले होते.





