मुंबई | Mumbai
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आकाशवाणी आमदार (MLA) निवासच्या कॅन्टीनमध्ये शिळं अन्न दिलं जात असल्याच्या कारणावरून कँटिन कर्मचाऱ्याला मारहाण (Beating) केली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यानंतर आज हा मुद्दा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर देतांना आमदार गायकवाड यांचे कान टोचले आहेत.
विधान परिषदेत संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडीओ मी स्वतः बघितला आहे. अशा प्रकारचे वर्तन आपल्या कुणासाठीही भूषणावह नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आपल्या सगळ्यांची आणि आमदारांची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होते. माहिती अशी आली की आमदार निवासातील व्यवस्था नीट नव्हती. भाजी वास मारत होती. या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते. त्याच्यावर कारवाई करता येते. तो वेगळा मुद्दा आहे. अध्यक्ष महोद्य, आमदार निवासामध्ये काहीही अनियमितता असेल, तर आपण स्वतः लक्ष घालावं”, असे त्यांनी म्हटले.
तसेच “अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधीने मारहाण करणे आणि त्याचे व्हिडीओ येणे. टॉवेलवर येऊन मारलं किंवा कसेही मारले तरी ते चुकीचेच आहे. योग्य नाही, यातून सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना जाते. आपण सत्तेचा गैरवापर करतो किंवा आमदार म्हणून आपलं वर्तन योग्य नाही, असे लोकांना वाटेल. ही गंभीर बाब आहे. अध्यक्षांनी याची दखल घ्यावी आणि यासंदर्भात काय कारवाई (Action) करायची, ती करावी”, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांना केली.
आमदार अनिल परब काय म्हणाले होते?
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटले होते की, सरकारचा आपल्याच आमदारांवर वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम सुरू आहे. एक आमदार बनियन आणि टॉवेलवर येतो आणि बॉक्सिंग करत असल्यागत एका साध्या माणसाला मारतो. अरे हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्याला मारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा क्लीन आहे आणि तुम्ही अशा आमदाराचा पाठिंबा घेणार का? असा सवाल त्यांनी केला. आपल्या विधिमंडळ कक्षात सदर विभाग येतो, त्यामुळे तुम्ही त्यांना निलंबित करा, अशी मागणी देखील परब यांनी केली.
मी केलेल्या गोष्टीचा पश्चाताप नाही – आमदार गायकवाड
कॅन्टीन मालकाची मुजोरी इतकी वाढली आहे, की अनेकांच्या ताटात पाल, उंदिर, झुरळं निघतात. कालच्या घटनेनंतर अनेकांचे फोन आले आणि त्यांनी आमच्यासोबतही असं घडल्याचे सांगितले. या निकृष्ट जेवणाबद्दल माझी त्या कँटिनमध्ये अशाप्रकारे रिअॅक्शन होती. मी केलेल्या गोष्टीचा मला पश्चाताप नाही, मी विधानभवनात अध्यक्षांनी परवानगी दिली तर हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आमदार असलो तरी मी माणूस आहे, कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल, तर मला माझ्या जीवनरक्षणाचा अधिकार आहे’, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले.




