नागपूर | Nagpur
राज्य सरकारकडून शनिवारी महाराष्ट्रातील (Maharashtra) २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने दुष्काळी भागातील पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच दुष्काळबाधित शेतकऱ्यांना मदत मिळणर आहे. मात्र, पुढील कालावधीत राज्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राज्यावर ‘एल निनो’चे (El Niño) सावट गडद झाले असून, पुढील वर्षीही मान्सूनसाठी प्रतिकूल असणाऱ्या एल निनोचा (EL NINO) प्रभाव कायम राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पॅसिफिक महासागरातील उष्णतेमुळे निर्माण झालेला एल निनो फेब्रुवारी महिन्यात अधिक तीव्र होईल आणि त्यानंतर त्याची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होईल,’ असा अंदाज व्यक्त करत राज्य सरकारकडून आगामी अडचणींसाठी सर्व प्रकारची तयारी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते नागपूरात (Nagpur) पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांना सरसकट मदत, कुणीही वंचित राहणार नाही
पावसातील (Rain) मोठ्या खंडामुळे राज्यातील ७५ टक्के भागाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यावर बोलताना त्यांनी प्रशासकीय उपायांची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून तिथे तातडीची मदत पोहोचवली जात आहे. दुष्काळ निवारणासाठी १२ महत्त्वाच्या उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली असून पंचनामे वेगाने सुरू आहेत. ज्या तालुक्यांची नावे सुरुवातीच्या यादीत सुटली आहेत, त्यांची पाहणी करून ट्रिगर-३ अंतर्गंत त्यांनाही यादीत समाविष्ट केले जाईल. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.
जुलै-ऑगस्ट २०२७ पर्यंत पाण्याचे नियोजन
दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी जलसाठ्यांचे सूक्ष्म नियोजन केले जात असल्याचे स्पष्ट करत फडणवीस म्हणाले की, सर्व जिल्ह्यांना आपापला पाण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धरणांमधील उपलब्ध साठ्यातून जुलै-ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवले जाईल.आवश्यक साठा सुरक्षित ठेवून शिल्लक पाणी रब्बी हंगाम आणि कारखान्यांसाठी वापरण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी म्हटले.
दुष्काळात उधळपट्टी टाळा
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लग्नसोहळे साध्या पद्धतीने करण्याच्या केलेल्या आवाहनाचे देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले. ते म्हणाले, अशा परिस्थितीत समाजाने संवेदनशीलता दाखवत अनावश्यक खर्च टाळावा आणि तोच निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पॅसिफिक महासागरात थंड वारे वाहू लागल्यानंतरच एल निनोचा प्रभाव पूर्णपणे ओसरेल. तोपर्यंत सरकार सर्व संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




