मुंबई | Mumbai
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ८ टक्के मतदारांची वाढ झाली असल्याचे ट्वीट केले होते. तसेच फडणवीस यांनी स्वतःच्या मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत राहुल गांधींच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ट्विटमध्ये म्हटले की, “राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पराभवाची वेदना दिवसेंदिवस वाढत जात आहे. परंतू कुठपर्यंत तुम्ही हवेतच तीर चालवत राहणार? तुमच्या माहीतीसाठी सांगतो की महाराष्ट्रात असे २५ हून अधिक मतदारसंघ आहेत. ज्यात लोकसभा आणि विधानसभा दरम्यान ८ टक्के मतदार वाढले आहेत आणि अनेक जागी काँग्रेसही जिंकलेली आहे. माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात ७ टक्के (२७,०६५ ) मतदार वाढले आणि तेथून काँग्रेसचे विकास ठाकरे निवडून आले आहेत”, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
तसेच “उत्तर नागपूर मतदार संघात ७ टक्के (२९,३४८) मतदार वाढले आणि तेथून काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले आहेत. अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेवरी मतदारसंघात १० टक्के (५०,९११) मतदार याच काळात वाढले आणि तेथे शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे जिंकले आहेत. मालाड पश्चिम येथे ११ टक्के (३८,६२५) मतदार वाढले आणि तेथे काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख निवडून आले आहेत. मुंब्रा येथे ९ टक्के (४६,०४१) मतदार वाढले आणि तेथे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड निवडून आले आहेत. सहकारी पक्षाच्या जाऊ देत परंतू स्वत:च्या पक्षाच्या अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांच्यासारख्या जुन्या सहकाऱ्यांशी तरी ट्वीट करण्यापूर्वी बोलले असते तर चांगले झाले असते असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला लगावला. कमीत कमी काँग्रेसमधील संवादाच्या अभावाचे इतके वाईट प्रदर्शन तरी झाले नसते, असेही फडणवीस यांनी शेवटी म्हटले.
राहुल गांधी पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले होते?
राहुल गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले होते की,” महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, मतदार यादीत फक्त ५ महिन्यांत ८ टक्के वाढ झाली. तर काही बूथवर २० ते २५ टक्के वाढ झाली. तसेच बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले. पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केले. असे सर्व सुरू असतांना निवडणूक आयोग गप्प आहे की यात सहभागी आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. शिवाय म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतोय. असेही राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते.





