मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिला अपात्र ठरवल्या गेल्याचं समोर आलं आहे. यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटी ६६ लाखांवर आली आहे. मात्र, यावरूनच आता विरोधकांनी सरकारवर चांगलेच टिकास्त्र सोडले असून लाखो लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्यावरून प्रश्न विचारण्यात येत आहेत. आधी शिवसेनेच्या सुषमा अंधारे, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ असे म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हंटले आहे की, लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे असं जयंत पाटील म्हणाले.
देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे. ज्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात जागतिक मंदीने अधिक भर घातली आहे. आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला जयंत पाटील यांनी सरकारला लगावला.
रोहित पवार काय म्हणाले?
निवडणुकीपूर्वी 2.47 कोटी लाभार्थी असलेल्या लाडकी बहीण योजनेत या लबाड सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींची नावे उडवली आहेत. KYC फक्त बहाणा आहे, लाभार्थी लाडक्या बहिणींची नावे टप्प्याटप्प्याने उडवून योजना बंद करणे हाच खरा निशाणा आहे.
आज या लाडक्या बहिणीला बोगस लाभार्थी म्हणणाऱ्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही KYC न करता योजना राबवली असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक करून सरकारने केलेली बोगसगिरी नाही का ? लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे त्रास दिला किंवा पैसे परत घेण्याची भाषा केली तर सरकारला महागात पडेल. त्यामुळे सरकारला या 15000 हजार कोटीची वसुली करायचीच असेल तर मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून करावी, लाडक्या बहिणीला कुठल्याही प्रकारे त्रास दिला तर याद राखा…!
सुप्रिया सुळेंची टीका
लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले. निवडणूकीच्या काळात कसलीही खातरजमा न करता घाईघाईने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आणि आता साधारणपणे वर्ष दीड वर्षाने सरकारला या योजनेत ८० लाख महिला अपात्र असल्याचा साक्षात्कार व्हावा ही मोठी अजब बाब आहे. हे या सरकारचे राजकीय, प्रशासकीय आणि अंमलबजावणीतील सामूहिक दारुण अपयश आहे.
जनतेच्या कष्टातून निर्माण झालेला कर रुपी पैशांतून ही योजना चालविली जाते. थोडक्यात जनतेचा पैसा गेली वर्ष दीड वर्ष हे सरकार अपात्र लाभार्थ्यांना वाटत होते का असा प्रश्न उपस्थित होतो. ही संपूर्ण बाब मूळात या सरकारचे घोर अपयश उघड करणारी आहे.
हे दिलेला शब्द पाळणारे सरकार नाही. केवळ निवडणूकीतील फायदा गृहित धरून त्यांनी महिलांना खोटे आमिष दाखविण्याचा उद्योग केला असे यावरुन स्पष्ट होते. तब्बल ऐंशी लाख महिलांना अपात्र घोषित करुन या सरकारने राज्यातील महिलांचा विश्वासघात केला आहे.
हा ८० लाख हा आकडा छोटा नाही. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनीस ‘लाडकी बहीण’ योजनेचे लाभ नियमितपणे मिळालेच पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. यासाठी त्यांना विशिष्ट मुदतीत केवायसी करण्याची आडकाठी असू नये. राज्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी त्यांना केवायसी करण्याची संधी कायम उपलब्ध करुन द्या.




