Tuesday, April 28, 2026
HomeराजकीयMaharashtra News : "ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्यूटर गेम”, पटोलेंचे विधान; बावनकुळे पलटवार...

Maharashtra News : “ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्यूटर गेम”, पटोलेंचे विधान; बावनकुळे पलटवार करत म्हणाले “त्यांचा मेंदू…”

मुंबई | Mumbai 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारतीय सैन्याने (Indian Army) ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवून पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत चोख प्रत्युत्तर दिले होते. यानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या कारवाईस पाठिंबा दिला होता. परंतु, आता मात्र काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलतांना वादग्रस्त विधान केले आहे.

- Advertisement -

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, “भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात एक वक्तव्य केले. त्यावरून असे स्पष्ट होत आहे की, भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरबाबत पूर्वकल्पना दिली. तसेच तुमच्या लोकांना तिथून हटवा, असे सांगण्यात आले. शिवाय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारावरून धमकी दिल्यानंतर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले. याचा अर्थ असा की,”लहान मुले कॉम्प्युटरवर गेम खेळतात तसा गेम खेळवण्यात आला”, असे त्यांनी म्हटले आहे.

बावनकुळे यांचे पटोलेंना उत्तर

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी(Chandrashekhar Bawankule) एक्सवर पोस्ट करत तिखट प्रत्युत्तर दिले आहे.ते म्हणाले की, “नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरचा कॉम्प्युटर गेम म्हणून उल्लेख केला. यावरून काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणे म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही?”, असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला.

तसेच “नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे! देशाच्या जवानांचं शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि भारत मातेच्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधीही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे आणि कोण पाकिस्तानच्या! नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे”, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच...