त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी पावसाची (Rain) वाट पाहणाऱ्या त्र्यंबकवासीयांना अखेर आज मोठा दिलासा मिळाला आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे आज (शनिवारी) दुपारी चारच्या सुमारास मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावत दमदार सलामी दिली. जून उजाडल्यानंतर तब्बल १२ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मृग नक्षत्राचा पाऊस दाखल झाल्याने शेतकरी (Farmer) राजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदा पाऊस लांबल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले होते. पेरण्या खोळंबण्याची भीती असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. अखेर आज दुपारी अचानक ढग जमा झाले आणि चार वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पहिल्याच पावसाने संपूर्ण त्र्यंबकनगरीला झोडपून काढले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना (Citizen) मोठा दिलासा मिळाला आहे.
पाणीटंचाईमुळे गृहिणींची पावसाचे पाणी साठवण्यासाठी धावपळ
सध्या त्र्यंबकेश्वर नगरी तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहे. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाऊस सुरू होताच गृहिणींनी कोणतीही वेळ न घालवता तात्काळ धावपळ सुरू केली. हा पाऊस असाच सुरू राहिला तर निदान दैनंदिन वापरापुरते तरी पाणी उपलब्ध होईल, या आशेने महिलांनी छतावरून पडणारे पावसाचे पाणी ड्रम, बादल्या आणि इतर भांड्यांमध्ये भरून साठवण्यास सुरुवात केली.




