मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजाचा विषय अत्यंत गंभीर आहे. निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काही अर्थच नाही. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित केलेच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे. चव्हाण यांनी शनिवारी एक्स या समाज माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील कारवाईसाठी कायदेशीर मार्गावर भर दिला आहे.
सर्वप्रथम, काँग्रेस (Congress) पक्षाने ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलावली पाहिजे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घ्यावी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची मागणी करावी, असे चव्हाण यांनी सुचवले आहे. काही घटनात्मक अडचणी असल्यास, राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम ३२ किंवा कलम १४२ अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्ताच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करण्याची विनंती न्यायालयाला करावी.
सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आयुक्तांना आणि आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावू शकते तसेच संबंधित कागदपत्रे मागवू शकते. प्रशासनातील गंभीर त्रुटींबाबत वृत्तपत्रांतून माहितीच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अशा प्रकारे पावले उचलली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. शेवटी, राज्यघटनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षाने महाभियोगाचा प्रस्ताव मांडला पाहिजे. जर इतर सर्व मार्ग अयशस्वी ठरले तर अखेरीस देशभर आंदोलन करणे हाच अखेरचा पर्याय उरतो, असे चव्हाण यांनी नमूद केले आहे.




