Monday, September 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAmit Shah : पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनिमित्त महिनाभर 'सेवा संकल्प...

Amit Shah : पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनिमित्त महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’; मुंबईत अमित शाहांची घोषणा

नेमके काय कार्यक्रम होणार? 

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची यशस्वी २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या रौप्य महोत्सवी कारकिर्दीचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) वतीने देशभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत देशभरात १२ प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

यावेळी शाह म्हणाले की, “२०१४ पूर्वी आपला देश भ्रष्टाचार, जातीवाद आणि परिवारवादाने ग्रसला होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील काळात या नकारात्मक गोष्टी समूळ नष्ट झाल्या असून देशाची वाटचाल विकास आणि कामगिरीच्या राजकारणाकडे (Politics of Performance) सुरू झाली आहे. आज भारत (India) ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली असून गेल्या दशकभरात २५ कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पत सुधारून भारतीय पासपोर्टचे महत्त्व अधिक वाढले आहे”, असे त्यांनी म्हटले.

‘उपभोग शून्य स्वामी’ आणि ‘प्रधान सेवक’ संकल्पना

पुढे ते म्हणाले,”पंतप्रधान मोदी यांनी संत श्री समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) यांच्या ‘उपभोग शून्य स्वामी’ संकल्पनेवर आणि गुरू नानक देवजींच्या विचारांवर आधारित जनसेवा केली आहे. स्वतःला ‘प्रधान सेवक’ मानून त्यांनी सलग २५ वर्षे जनतेची सेवा करण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे, असेही शाह यांनी सांगितले.

अभियानातील १२ प्रमुख कार्यक्रम

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) सुरू होणाऱ्या या अभियानात प्रत्येक जिल्हा, विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रात विविध सेवाभावी उपक्रम राबवले जातील. यामध्ये प्रामुख्याने व्यापक रक्तदान शिबिरे, अंगणवाडी सेवा व आभार उपक्रम, नमो सेवा, संगीत व नाट्यमय सादरीकरण, सेवा ज्योती कलश यात्रा, ‘वडनगर ते वाराणसी’ आणि ‘वाराणसी ते वडनगर’ यात्रा आणि ब्लॉक व तालुका स्तरावर ‘सेवा सेतू अभियान’ यांचा समावेश असेल. या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि राष्ट्रसेवेचा हा संकल्प अधिक दृढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

समान नागरी कायद्याबाबत काय म्हणाले?

यावेळी अमित शाह यांनी समान नागरी कायद्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, “एनडीए (NDA) ची सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये २०२९ सालापूर्वी समान नागरी कायदा लागू केला जाईल. उत्तराखंड आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये समान नागरी कायद्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली गेली असून, टप्प्याटप्प्याने सर्व एनडीएशासित राज्यांत याची अंमलबजावणी केली जाईल. धर्म किंवा तुष्टीकरणाच्या राजकारणाऐवजी देशातील प्रत्येक नागरिकाला कायद्यासमोर समान अधिकार आणि न्याय मिळणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समान नागरी कायदा म्हणजे काय? (Uniform Civil Code)

समान नागरी कायदा (यूसीसी) म्हणजे देशातील सर्व नागरिकांसाठी त्यांचा धर्म, जात किंवा पंथ कोणताही असो एकच समान कायदा असणे. सध्या भारतात विविध धर्मानुसार विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक विधान आणि मालमत्ता हस्तांतरण यांसारख्या वैयक्तिक (Personal) बाबींसाठी वेगवेगळे धार्मिक कायदे लागू आहेत. समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर हे सर्व धर्मनिहाय वैयक्तिक कायदे संपुष्टात येऊन सर्व भारतीयांसाठी एकच सर्वसमावेशक नागरी कायदा लागू होईल.

ताज्या बातम्या

Nashik News : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना; मंदिरावर झेंडा लावताना...

0
सातपूर | Satpur गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सातपूर परिसरातील (Satpur Area) जेपी नगर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हनुमान मंदिरावर (Hanuman Mandir) भगवा झेंडा...