नांदेड | Nanded
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर आज (गुरुवारी) नांदेडमधील (Nanded) माता साहेब गुरुद्वारा परिसरात एका निहंगाने अचानक धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला (Attack) केला. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सुरक्षा व्यवस्था भेदून अचानक हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीरसिंह बादल हे आपल्या कुटुंबीयांसह (Family) खाजगी दौऱ्यावर नांदेड येथील गुरुद्वारात दर्शनासाठी (Darshan) आले होते. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही एका निहंगाने सुरक्षा कडे भेदून त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या गोंधळात बादल यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेला एक पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही जखमी झाले आहेत. पोलिसांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळावरूनच हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश
नांदेडमध्ये घडलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, या हल्ल्यामागचा मुख्य उद्देश काय होता आणि यामागे कोणती टोळी किंवा षड्यंत्र आहे का, याची सखोल चौकशी करण्याचे कडक आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.




